नोकऱ्या नाही, तर मी निवडणूक लढणार नाही! विश्वजित राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 10:41 AM2024-09-26T10:41:34+5:302024-09-26T10:42:30+5:30

बेरोजगारी संपवण्यासाठी २२ हजार सरकारी नोकऱ्यांची निर्मिती करा; मुख्यमंत्र्यांना विनंती

if there are no jobs i will not contest elections said vishwajit rane | नोकऱ्या नाही, तर मी निवडणूक लढणार नाही! विश्वजित राणे

नोकऱ्या नाही, तर मी निवडणूक लढणार नाही! विश्वजित राणे

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/वाळपई : बेरोजगार तरुणांसाठी आम्हाला सरकारी नोकऱ्या निर्माण कराव्याच लागतील. २२ हजार सरकारी नोकऱ्या यापुढे निर्माण करण्याची विनंती मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना करणार आहे जर आम्ही युवा-युवतींसाठी सरकारी नोकऱ्या निर्माण करू शकलो नाही तर पुढील विधानसभा निवडणूक मी लढवणारदेखील नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी जाहीर करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. २२ हजार नोकऱ्या सरकारला निर्माण कराव्या लागतील, प्रत्येक मतदारसंघात जवळपास एक हजार नोकऱ्या दिल्या तरच सुशिक्षितांमधील बेकारीचा प्रश्न सुटेल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे.

गोव्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र केंद्रीय अहवालातून उघड होऊन काही तासही उलटले नसताना विश्वजित राणे यांच्याकडून हे विधान आले आहे. याप्रश्नी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. वाळपई येथे भाजप सदस्य नोंदणी कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

राणे म्हणाले की, माझे वडील प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना २००५ ते २००७ या दोन वर्षांच्या काळातच त्यांनी तब्बल १२ हजार नोकऱ्या दिल्या. आज राज्यात सुशिक्षित बेकारांची फौज वाढली आहे. कामधंदा नसल्याने युवा वर्ग भरकटत चालला आहे. ही गंभीर बाच असून, किमान २२ हजार सरकारी नोकऱ्या निर्माण कराव्या लागणार असून या नोकऱ्यांची नितांत गरज आहे.

मत द्या, अशी जबरदस्ती करता येणार नाही

नोकऱ्या देताना हिंदू, खिस्ती. मुस्लिम, आदी धर्माच्या किंवा जातींच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्व धर्माच्या लोकांना नोकथा मिळायला हव्यात. आज प्रत्येक युवक, युवती सुशिक्षित बनल्या आहेत. त्यांना बरे, वाईट ठाऊक आहे. त्यामुळे यालाच मते द्या किया त्यालाच मते द्या, अशी जबरदस्ती करता येणार नाही, असेही राणे म्हणाले.

 

Web Title: if there are no jobs i will not contest elections said vishwajit rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.