यंदाचा नाताळ आणि नववर्ष गोव्यात साजरा करणार असाल तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 04:41 PM2017-12-12T16:41:29+5:302017-12-12T17:00:11+5:30

नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी गोव्यात जाण्याचा हल्ली ट्रेंडच आहे. तुम्हीही तिकडे जात असाल तर या अॅक्टीव्हीटीज नक्की करा.

If you are going to celebrate this Christmas and New Year in Goa then | यंदाचा नाताळ आणि नववर्ष गोव्यात साजरा करणार असाल तर

यंदाचा नाताळ आणि नववर्ष गोव्यात साजरा करणार असाल तर

Next
ठळक मुद्देभारतासह जगभरात नाताळ, २०१७ला अलविदा आणि नववर्षाचं स्वागत याची तयारी चालु आहे. आपापल्या सुट्ट्या सांभाळून लोकं हे व्हॅकेशन प्लॅन करण्यासाठी प्रतत्न करत असतात.महाराष्ट्रासह गोव्यातीलही सारी हॉटेल्स या सुट्ट्यांमध्ये सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गोवा : जगभरात वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो. महाराष्ट्रासह गोव्यातही याची खासियत वेगळी आहे. गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबरच येणारा हा सण ख्रिसमस सण गोवन लोकांसाठी आनंदाची पर्वणी असते. ख्रिसमसपासून ते नवी वर्षाच्या स्वागतापर्यंत संगीत आणि नृत्यरजनीचं आयोजन केलं जातं. घरं, दुकानं रोषणाईने उजळून निघतात. घराबाहेरील अंगणात येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे केले जातात. गोव्यानं आजवर ख्रिसमसची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती अतिशय आपुलकीनं आणि पारंपारिक बंधु-भावाच्या आपुलकीने जोपासलेली आहे. आजकाल नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत यांचं ‘टाय-अप’ झाल्यामुळे नाताळ सणालाही व्यावसायिक स्वरूप आल्याचं जाणवतं. त्यामुळे अनेक हॉटेल्स, पब्स पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. जर, तुम्हीही यंदा ख्रिसमसला गोव्यात जाणार असाल तर तिथं गेल्यावर काय काय करायला हवं याविषयी आज आम्ही सांगणार आहोत. 

चर्चमधील सामुहिक कॅरोल

गोव्यात जवळपास ४०० हून अधिक लहान-मोठे चर्च आहेत. त्यामुळे ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी गोव्यापेक्षा जास्त चांगलं ठिकाण दुसरं कुठेच असू शकत नाही. दि बॅसिलिटा ऑफ बोम जेसूस आणि दि इम्यूकॅल्यूट कन्सेप्शन चर्च हे दोन चर्च चांगले पर्याय आहेत. येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे आभार यावेळेस मानले जातात. तसंच इकडे सामुहिक हिम्नस आणि कॅरोल गायन होतं. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २४ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील ख्रिस्ती बांधवांकडून कोंकणी भाषेतील ‘बाळ येशूचा जन्म झाला’ असं कॅरोल गायलं जातं. पिढ्यानपिढ्या गायलं जाणारं हे कॅरोल आता नाताळचं थीम साँग म्हणूनही ओळखलं जातं. तसेच अनेक चर्चमध्ये सामुहिक हिम्नस आणि कॅरोल गायन केलं जातं. त्यातही तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यातून तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. रात्री १० नंतर ख्रिसमसची तयारी सुरू होते, त्यामुळे वेळेत पोहोचून तुम्ही तुमचं बुकींग कन्फर्म करा. 

आणखी वाचा - यंदा न्यू इअर पार्टीसाठी पुण्यातील ही हॉटेल्स नक्की ट्राय करा

ख्रिसमस डिनर

ख्रिसमस डिनरचा आनंद घ्यायचा असेल तर एखादं फॅन्सी रेस्टॉरंटची निवड करा. रोस्ट टर्की, पोर्क सोरपटल (पोतुर्गीज पदार्थ)किंवा इतर मांसाहारी पदार्थांचा आस्वाद तुम्ही इथं घेऊ शकता. गोव्यातलं सगळ्यात प्रसिद्ध मिष्ठान्न म्हणजे बेबिकाना. ख्रिस्टमसच्या या दिवसात बेबिकाना खायला अजिबात विसरू नका. 

पुतळा जाळून नष्ट करा दु:ख

पुतळा जाळून ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे गोव्यातही हा सण अशाच पद्धतीने साजरा केला जातो. आजही येथील गोवन लोकांनी ही परंपरा कायम जोपासली आहे. जुन्या कपड्यांचा आणि गवताचा वापर करून हे पुतळे बनवले जातात. सगळ्या चिंता मिटाव्यात, सगळी दु:ख नष्ट करण्यासाठी हा दु:खांचा हा प्रतिकात्मक पुतळा जाळला जातो. 

बीचवरची फटाक्यांची आतिषबाजी

ख्रिसमसच्या पूर्व संध्येला आणि ख्रिसमसच्या सायंकाळी तुम्ही गोव्याच्या बीचवर गेलात तर तुम्हाला बीचवरच फटाक फोडताना दिसतील. या गोव्यातल्या थंडीत छान उबदार कपड्यांसोबत बाहेर पडा. थेट बीच गाठा आणि बीचवर एखादी जागा शोधून तिथं बसा. आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यात फार वेगळीच मजा येते. ख्रिस्टमसची संध्याकाळ आणि नविन वर्षाचं स्वागत करण्यासाठी इथं असाच धुमधडाका असतो. गोव्याच्या उत्तर भागात बागा आणि कॅलंगूट आणि गोव्याच्या दक्षिण दिशेला कोलवा आणि बोगमॅलो अशी बीच या फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

संगीत आणि नृत्यरजनींची धम्माल

यंदा २७ ते ३० डिसेंबर दरम्यान वॅगटोर बीचवर म्युझिक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. हे म्युझिक फेस्टिव्हल आशियातलं सगळ्यात प्रसिद्ध आहे. या म्यूझिक फेस्टिव्हलमध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध गायक येत असतात. डान्स, गाणी आणि भरपूर मनोरंजन अशा विविध कार्यक्रमांनी भरलेला हा म्यूझिक फेस्टिव्हलला तुम्ही यंदा नक्कीच हजेरी लावा. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तुम्हाला यावेळी मिळेल. गोवा हे जगभरातील पर्यटकांसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे गोव्यातलं हे पर्यटन असंच समृद्ध व्हावं याकरता सरकारही अशा संगीत आणि नृत्यरजनींना प्रायोजकत्व देतं. 

Web Title: If you are going to celebrate this Christmas and New Year in Goa then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.