तुम्हाला जमत नसेल तर सांगा, आम्ही स्टेडियम उभारू! 'साग'चा जीसीएला पत्राद्वारे थेट इशारा
By समीर नाईक | Published: July 5, 2024 01:25 PM2024-07-05T13:25:42+5:302024-07-05T13:26:42+5:30
रेंगाळलेल्या प्रक्रियेवरून नाराजी
समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाबाबत जीसीएने आतापर्यंत काय केले? त्यांची तयारी कुठपर्यंत पोहोचली? ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या मनःस्थितीत आहेत की नाही? याची उत्तरे मिळविण्यासाठी गोवा क्रीडा प्राधिकरण (साग) ने जीसीएला पत्र लिहिले आहे. या पत्राचे उत्तर लवकरात लवकर द्यावे, अन्यथा सरकारच क्रिकेट स्टेडियम उभारेल, असा इशाराच सागने जीसीएला दिल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान व्हावे ही गोमंतकीयांची इच्छा आहे. तसेच ही मागणी खूप जुनी आहे. परंतु अद्याप गोमंतकीयांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी कुठेच पाऊल उचलताना दिसून येत नाही. गोवा क्रिकेट संघटनांतर्फे धारगळ येथील संघटनेच्या जमिनीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न सुरू होते. सराव स्टेडियम, इनडोअर सराव क्षेत्र इत्यादी सर्व सुविधांसह हे मैदान १.३० लाख चौरस मीटरमध्ये तयार केले जाईल. मैदानात फ्लडलाइट असेल जेणेकरून स्टेडियम ४५,००० लोकांच्या क्षमतेचे दिवस-रात्र सामने आयोजित करू शकतील, असेही बोलले जात होते. पण या गोष्टीला आता जवळपास नऊ वर्षे होत आली, तरीही येथे अद्याप काहीच झालेले नाही.
मध्यंतरी डिचोली तालुक्यातील वन म्हावळींगे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावे, अशी इच्छा तेथील आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केल्यानंतर पुन्हा हा विषय लांबणीवर पडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या विषयावर पूर्णविराम लावण्यासाठी क्रीडा खात्यातर्फे हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सागतर्फे जीसीएला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे.
जीसीएच्या प्रत्युतरानंतरच सागतर्फे निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु सागने सरकारी निधीतून आंतर- राष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमय बांधण्यासाठी तयारी केली आहे. जीसीएला धारगळची जमीनही क्रीडा खात्याकडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे. जर जीसीएला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारायला होत नसेल, तर धारगळ येथे क्रीडा खातेच राज्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम लवकरात लवकर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण हे स्टेडियम उभारण्याचे पहिले प्राधान्य जीसीएचे आहे. जर जीसीए सध्या स्टेडियम उभारण्याच्या स्थितीत नसेल तर आम्ही धारगळ येथे स्टेडियम उभारू, यासाठी जीसीएला पत्रही लिहिण्यात आले आहे. - गोविंद गावडे, क्रीडामंत्री
धारगळ येथे संघटनेच्याच मालकीची जागा आहे, परंतु अद्याप येथे खूप काम करणे बाकी आहे. सरकारकडूनच आवश्यक असणाऱ्या परवानगी मिळालेल्या नाहीत. आमची जी सध्या स्थिती आहे ती आम्ही लवकरच लेखीस्वरुपात क्रीडा खात्याला कळविणार आहोत. पण सरकारच्या पाठिंब्याशिवाय स्टेडियम उभारणे आम्हालाही शक्य नाही. - रोहन गावस देसाई, सचिव, जीसीए
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम डिचोली तालुक्यात व्हावे, अशी माझी इच्छा आहे. वन म्हावळींगे येथील जागा जीसीएच्या मालकीची आहे, तर धारगळ येथील जागा ही सरकारने त्यांना भाडेतत्त्वावर दिली आहे. ती जागा सरकार केव्हाही आपल्या ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे जीसीएने स्वतःच्या वन म्हावळींगे येथील जागेवर स्टेडियम उभारावे, असे मला वाटते. पेडणेत आधीच खूप प्रकल्प आलेले आहेत, त्यामुळे डिचोली हीच योग्य जागा असेल. - डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली मतदारसंघ.