सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत सिनेमा दाखविण्यास हरकत नाही- मनोहर पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 06:27 PM2018-01-10T18:27:31+5:302018-01-10T18:58:12+5:30
सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत घेण्याचे कारण दिसत नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास माझा तरी तत्त्वत: विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.
पणजी : सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत घेण्याचे कारण दिसत नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास माझा तरी तत्त्वत: विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.
पर्रीकर म्हणाले, की पद्मावत चित्रपटाकडे सध्या सेन्सॉर मंडळाचे प्रमाणपत्र नाही, अशी माहिती मिळते. सेन्सॉरचे प्रमाणपत्र नसताना सिनेमा दाखविताच येत नाही. गेल्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट गोव्यात दाखविण्याची मागणी झाली होती, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे क्लेशकारक ठरले असते. कारण त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी गोव्यात असते. यापुढेही जर सेन्सॉरचे प्रमाणपत्र असेल तर त्याविषयी विचार करता येईल, पण आताच निर्णय घेता येत नाही. त्यावेळची परिस्थिती पाहावी लागते. पोलीस खाते ते काम करील.
बीफप्रश्नी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की कायदेशीर पद्धतीने गोव्यात बीफची आयात करण्यास आक्षेपच नाही. त्याला कुणी हरकत घेऊ शकत नाही. पोलिसांकडून गोव्याच्या सीमांवर बीफ आयातीवेळी कागदपत्रे तपासली जातील. कायदेशीर पद्धतीने येत असलेले बीफ कुणी अडवू शकत नाही. जे कथित गोरक्षक आक्षेप घेत आहेत, त्यांनी जर कायदेशीर पद्धतीने येणा-या बीफच्या विषयात हस्तक्षेप करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्यांच्याविरुद्ध करवाई केली जाईल.
म्हादई पाणीप्रश्नी बोलताना पर्रीकर म्हणाले, की म्हादईचा विषय हा आपल्यापुरता संपलेला आहे. कारण हा विषय लवादासमोर आहे. अकारण प्रसारमाध्यमांनीच हा विषय वाढवला. आपण चर्चेसाठी तयार आहे, असे कर्नाटकला कळवले. आपण पाणी देतो, असे कळवले नाही. तरी देखील पत्राचा वेगळा अर्थ लावला गेला. मी दिल्ली भेटीवेळी म्हादई पाणी प्रश्नी कुणाशी बोललो नाही. कारण आता तो विषय राहिलेलाच नाही. दरम्यान, गोव्यात मांडवी नदीवर जो तिसरा पूल उभा राहत आहे, त्याचे काम येत्या जून-जुलैमध्ये पूर्ण होईल. साधारणत: ऑगस्ट महिन्याच्या आसपास या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे. पंतप्रधानांनी निमंत्रण स्वीकारले आहे. शक्य झाल्यास दोन पावलं येथे ऑगस्टमध्येच कन्वेन्शन सेंटरचीही पायाभरणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.