फुटपाथवर वाहन पार्क करत असाल, तर कारवाईला सामोरे जा!
By समीर नाईक | Published: August 12, 2023 06:52 PM2023-08-12T18:52:33+5:302023-08-12T18:52:45+5:30
पणजी, मेरशी या भागात गेल्या दोन दिवसात बेशिस्त पार्क केलेल्या किंवा फुटपाथवर पार्क केलेल्या सुमारे ३० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे
पणजी: बाणस्तारीच्या भयानक जीवघेण्या अपघातानंतर वाहतुक पोलिसांसोबत, वाहतुक अधिकारी देखील सर्तक झाले असून, अनेक मोहीम आता वाहतुक पाेलिसांकडून राबविण्यात येत आहे. मद्यपींवर कारवाई होत असताना शहरातील ठिकठिकाणी बेशीस्तरित्या पार्कींग केलेल्या वाहनांवर देखील कारवाई वाहतुक पोलिसांनी कारवाई केली आहे.
पणजी, मेरशी या भागात गेल्या दोन दिवसात बेशिस्त पार्क केलेल्या किंवा फुटपाथवर पार्क केलेल्या सुमारे ३० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी पाट्टो भागातील अनेक वाहनांवर कारवाई करत चलन काढण्यात आले आहे. दुचाकींंचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. खासकरुन अनेक इमारतीसमोरील फुटपाथवर पार्क केलेल्या वाहनांवर सर्वाधिक चलन काढण्यात आले आहे.
५०० रुपयांचा दंड
पणजीतील पाट्टो भागातील सुमारे २० वाहनांवर कारवाई करत ५०० रुपये दंड देण्यात आला आहे. काही ठिकाणी जर चालक उपस्थित असल्याने थेट दंड वसूल करण्यात आला आहे, तर जेथे फक्त वाहने पार्क करुन ठेवण्यात आली होती, तेथे गाडीलाच चलन लावण्यात आले आहे. या गाडीच्या मालकांना हे चलन ऑनलाईन पध्दतीने भरावे लागणार आहे.
बेशिस्त वाहने वाहतुक सुरळीत ठेवण्यास अडथळा निर्माण करत असतात. तसेच फुटपाथवर वाहने पार्क केल्याने लोकांना याचा त्रास होतो. कायद्याने हा गुन्हा आहे. वेळोवेळी शहरात आम्ही अशाप्रकारची कारवाई करत आलो आहे, आणि यापूढेही अशीच सुरु राहणार आहे.- जे. डिसा, वाहतुक पोलिस निरीक्षक