गोव्यात इफ्फीचा उद्या समारोप, अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 07:41 PM2017-11-27T19:41:38+5:302017-11-27T19:41:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) समारोप उद्या मंगळवारी सायंकाळी होत आहे. समारोपावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव तथा पर्सनलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मामित केले जाणार आहे.
पणजी : गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) समारोप उद्या मंगळवारी सायंकाळी होत आहे. समारोपावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव तथा पर्सनलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मामित केले जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेसृष्टीत दिलेल्या एकूण योगदानाचा गौरव हजारो सिनेरसिकांच्या साक्षीने केला जाणार आहे. पूर्ण बच्चन कुटुंबीय या सोहळ्य़ास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
यावेळी इफ्फीसाठी सुमारे साडेसात हजार प्रतिनिधींची नोंद झाली आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सायंकाळी चार वाजता समारोप सोहळा होईल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. अभिनेता सलमान खान, कटरिना कैफ आदी कलाकार उपस्थित राहतील असे सांगण्यात आले. पण, आयोजकांनी अजून अधिकृतरित्या नावे जाहीर केलेली नाहीत. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक म्हणाले, की अमिताभ बच्चन येणार हे निश्चित आहे. इतरांची नावे निश्चित झालेली नाहीत.
गोव्यात गेला आठवडाभर इफ्फीचा माहोल राहिला. जगभरातील चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांनी घेतला. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणा म्हणून अभिनेता शाहरूख खान उपस्थित राहिला होता. याशिवाय श्रीदेवी, शाहिद कपूर आदींची उपस्थिती होती. नाना पाटेकर, अनुपम खेर, किरण शांताराम व अन्य अनेक हिंदी आणि मराठी कलाकारांनी इफ्फीत भाग घेतला. माईक पांडे व अन्य माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांनीही इफ्फीची शान वाढवली. मास्टर क्लासेस व गटवार चर्चेचे कार्यक्रम रंगले. तरुण निर्मात्यांसाठी सोमवारी तुम्ही तुमचा पुढील सिनेमा कसा तयार कराल या विषयावर गटश: चर्चा झाली. इफ्फीलाच जोडून चार दिवस फिल्म बाजारही पार पडला. तिथेही शेकडो इफ्फी प्रतिनिधी येऊन गेले. मास्टर क्लास, पॅनल चर्चा, इफ्फीच्या समारोपाची तयारी एनएफडीसी आणि गोवा मनोरंजन संस्थेने चालवली आहे. थिंकींग ऑफ हिम हा आज समारोपाचा सिनेमा असेल. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमकडे आज कडेकोट पोलिस बंदोबस्त असेल. त्याबाबतची रंगीत तालिमही झाली आहे.
दरम्यान, एस. दुर्गा हा बहुचर्चित चित्रपट येथील कला अकादमीमध्ये सोमवारी सायंकाळी ज्युरी सदस्यांसाठी दाखविण्यात आला. केरळच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही आयोजकांनी प्रारंभी थोडी टाळाटाळ केली. तथापि, आपण न्यायालयात अवमान याचिका सादर करणार असल्याचा इशारा एस. दुर्गाच्या निर्मात्याने दिल्यानंतर ज्युरींसाठी सिनेमा प्रदर्शित करण्यास आयोजक तयार झाले.