IFFI: गोवा चित्रपट महोत्सवासाठी द्यावे लागणार ११८० रुपये इफ्फी शुल्क, जीएसटीमुळे नोंदणी महाग, वाढीव शुल्कामुळे नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:39 AM2021-10-24T05:39:32+5:302021-10-24T05:40:58+5:30
International Film Festival of India : विद्यार्थी प्रतिनिधींसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सुरुवातीला प्रतिनिधी नोंदणी ३०० रुपये होती, नंतर त्यात वाढ करून इफ्फीचे नोंदणी शुल्क १ हजार रुपये करण्यात आले होते.
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चित्रपट व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमींसाठी इफ्फी शुल्क ११८० रुपये आहे. या शुल्कात १८ टक्के वस्तू आणि सेवाकराचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थी प्रतिनिधींसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सुरुवातीला प्रतिनिधी नोंदणी ३०० रुपये होती, नंतर त्यात वाढ करून इफ्फीचे नोंदणी शुल्क १ हजार रुपये करण्यात आले होते. वाढीव शुल्कावरून प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. चित्रपटप्रेमींची रुची लक्षात घेऊन हेे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे.
नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, झी-५, वूट आणि सोनी लाईव्ह या ओटीटी माध्यमातून इफ्फीचा आनंद लुटता येणार आहे. कोरोना काळात सिनेमागृहे बंद होती, तेव्हा ओटीटी माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.
महोत्सव कधी?
राज्यात दि. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवात जगभरातील २२ प्रसिद्ध अतिथींचा सहभाग असणार आहे. यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, नृत्य दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आदींचा सहभाग असणार आहे. यंदा महोत्सवात ओटीटी व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे.