इफ्फीचे उद्घाटन शाहरूख खानच्या हस्ते, आयोजकांकडून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 07:51 PM2017-11-15T19:51:38+5:302017-11-15T20:57:42+5:30
पणजी: येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 रोजी बांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात सायंकाळी बॉलिवूडचे बादशाह शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पणजी: येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 रोजी बांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात सायंकाळी बॉलिवूडचे बादशाह शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इफ्फीच्या आयोजकांनी तसे जाहीर केले आहे.
उद्घाटन सोहळ्यावेळीच भारतीय चित्रपट उद्योग संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तसेच उद्घाटनानंतर कला अकादमीत इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्या बियोंड द क्वाऊड्स चित्रपटाने इफ्फीची सुरुवात होईल. तर इंडो-अजर्टाईन चित्रपट निर्माता पाबलो सेजार यांच्या रवींद्रनाथ टागोर यांच्यावर आधारित थिंकिंग ऑफ हीम चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.
जागतिक चित्रपट व खास करून भारतीय चित्रपट क्षेत्रात इफ्फी म्हणजे वेगळाच उत्साह दिसून येतो. जगभरातील उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी इफ्फी निमित्त व्यासपीठ दिले जात असून ही मोठी गोष्ट असल्याचे शाहरूख खान यांनी इफ्फी विषयी बोलताना सांगितले आहे. इफ्फी यंदा 48व्या वर्षात पदार्पण करत असून आम्ही चित्रपटाचे भवितव्य साजरे करू, या व मोठ्या मानाने आपण इफ्फी प्रतिनिधींचे स्वागत करत असल्याचे खान यांनी सांगितले आहे.
इफ्फीचे उद्घाटन करण्याची शाहरूख खान यांची ही प्रथम वेळ नसून त्यांनी 2007 मध्ये पणजीत 38व्या इफ्फीचे उद्घाटन केले होते. तसेच 2011 मध्ये मडगाव येथे 41व्या इफ्फीत देखील सहभागी होऊन त्यांनी उद्घाटन केले होते. शाहरूख खान बरोबरच अनेक दिग्गज कलाकार व बॉलिवूड सितारे यंदा इफ्फीत सहभागी होणार आहेत. इफ्फीच्या समारोप सोहळ्यात यंदा बीग बी अमिताभ बच्चन यांचा देखील गौरव होणार आहे. बच्चन यांनी भारतीय सिनेसृष्टीत दिलेल्या एकूण योगदानाचा गौरव समारोप सोहळ्यावेळी केला जाणार आहे.