इफ्फी अधिक चांगल्या प्रकारे होईल : अभ्यंकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 12:30 PM2018-10-24T12:30:15+5:302018-10-24T12:30:33+5:30
केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रलय गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी इफ्फीचे आयोजन करते.
- सद्गुरू पाटील
पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्याबाबतचा अनुभव गोव्याच्या यंत्रणेला बऱ्यापैकी मिळालेला आहे. त्यामुळे यावेळी पणजीत इफ्फी अधिक चांगल्या प्रकारे पार पडेल, असा विश्वास गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर(आयएएस) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला.
केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रलय गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी इफ्फीचे आयोजन करते. 2003 सालापासून गोव्यात इफ्फी होत आहे. अभ्यंकर म्हणाले, की गोव्यात इफ्फीमुळे सिनेमाची संस्कृती निर्माण झालेली आहे. चांगल्या दर्जाचे कोंकणी चित्रपट अलिकडे तयार झाले. जागतिक तोडीचे काही सिनेमा इथे साकारले. गोव्याची लोकसंख्या कमी असली तरी, या भागात खूप मोठे कलाकार, विचारवंत निर्माण होत आहेत. डी. डी. कोसंबीपासून अन्य विचारवंतांची नावे त्यासाठी घेता येतील. एकंदरीत ही भूमी सिने, कला यासाठी पोषक आहे व एकूणच सजर्नशीलतेला येथे खूप वाव आहे.
अभ्यंकर म्हणाले, की मुंबई व अन्य ठिकाणचे पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओ आता गोव्यात येत आहेत. गोव्यात सिनेमांचे चित्रिकरणही वाढलेले आहे. सिनेफाईल हा चित्रपट रसिकांचा स्वतंत्र क्लब येथे चालतो. तो आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झालेला आहे. त्यासाठी सरकारला पैसा खर्च करावा लागत नाही. इफ्फी विविध अर्थानी गोव्यासाठी उपयुक्त व मदतरुप ठरत आहे. वार्षिक सरासरी 15 ते 20 कोटी रुपये इफ्फीच्या आयोजनावर खर्च करावे लागतात पण हा खर्च वाया जात नाही. येथील अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचे ब्रँडिंग होत आहे.
अभ्यंकर म्हणाले, की यापूर्वीचे इफ्फी आयोजित करताना ज्या त्रुटी आढळून आल्या त्या यावेळी दूर झालेल्या असतील. त्यामुळेच प्रसार माध्यमांमधील प्रतिनिधींना स्वतंत्रपणो इफ्फी कार्डे एखाद्या हॉटेलमध्ये दिली जातील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काऊंटर असेल. दि. 20 नोव्हेंबरपासून इफ्फीला आरंभ होईल.