उपेक्षा खूप झाली, क्रांतिवीराचे स्मारक हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 01:48 PM2024-02-24T13:48:23+5:302024-02-24T13:49:24+5:30

पुण्यातील स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेतर्फे 'आठवणीतील मोहनदादा' कार्यक्रमाचे आयोजन आज पणजीत होत आहे, त्यानिमित्ताने.

ignoring of freedom fighter mohan ranade too much and now need a monument to the revolutionaries | उपेक्षा खूप झाली, क्रांतिवीराचे स्मारक हवे!

उपेक्षा खूप झाली, क्रांतिवीराचे स्मारक हवे!

वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

गोव्याचे क्रांतिवीर स्व. मोहन रानडे यांनी स्थापन केलेल्या स्वामी विवेकानंद जीवनज्योत या पुण्यातील संस्थेच्या वतीने आज (शनिवार २४ फेब्रुवारी) पणजीत 'आठवणीतील मोहनदादा' हा स्व. मोहन रानडे यांच्या गोवा मुक्ती लढ्यातील सहभागाच्या आणि त्यांच्या सुटकेनंतर गोवा, तसेच पुण्यात त्यांनी केलेल्या कार्याबद्दलच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला आहे.

स्व. मोहन रानडे गोव्यात सर्वांसाठी काका बनून राहिले, तर पुण्यात त्यांनी सगळ्यांचे वडील बंधू बनून मोहनदादा अशी आपली ओळख सोडून चार साडेचार वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. गोव्यात आणि पुण्यात नंतर स्व. मोहन रानडे यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. चोवीस वर्षाआधी एकाएकी मोहन रानडे आणि त्यांची प्रिय पत्नी विमलताई यांनी गोवा का सोडला आणि पुण्यात स्थायिक होऊन आपले समाजकार्य तेथेच सुरू ठेवण्याचा निर्णय का घेतला, यावर अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नसून गोमंतकीयांनी त्यांना आपले मानले नाही का, अशा आशयाचा सूर आजही कानावर पडतो. एक गोष्ट खरी आहे, गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी स्व. मोहन रानडे यांनी ज्या खस्ता खाल्ल्या, अपार त्याग केला, तारुण्य वेचले, त्यांच्या वाट्याला जो सन्मान यायला हवा होता, जी कदर व्हायला हवी होती ती कधीच झाली नाही. उपेक्षा मात्र खूप झाली आणि त्यांनी मुकाट्याने ती सहनही केली.

गोवा मुक्तीनंतरही तब्बल सात-साडेसात वर्षे लिस्बनमधील कॅशियस तुरुंगात खितपत पडण्याचे दुर्भाग्य मोहन रानडे यांच्या वाट्याला आले. त्याबाबत पुन्हा येथे नव्याने काही लिहिण्याची गरज आहे असे वाटत नाही. लिस्बनच्या तुरुंगातून सुटून त्यांच्या गोव्यात येण्याच्या घटनेला पूर्ण पंचावन्न वर्षे झाली आहेत. अगदी तारीखवार सांगायचे झाल्यास ८ फेब्रुवारी १९६९ रोजी मोहन रानडे यांनी पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झालेल्या गोमंतभूमीवर पहिले पाऊल ठेवले. तो क्षण त्यांच्यासाठी यादगार होता, त्याबद्दल ते भरभरून बोलायचे, पणजीतील आझाद मैदानावर त्या दिवशी जो उत्सव झाला, होय एक प्रकारे तो उत्सवच होता, त्या उत्सवाचा मीही एक प्रत्यक्ष साक्षीदार होतो. 

त्या आनंद सोहळ्यातील उत्सवमूर्तीशी कधी आपली भेट होईल, वा पन्नासेक वर्षे त्यांचा जवळचा सहवास लाभेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण, उण्यापुऱ्या पाच-सहा महिन्यांतच मोहन रानडे रायबंदरला आमच्या शेजारीच राहायला आले. त्यानंतर पाचेक दशके आमचा सहवास कायम राहिला. काकांचे गोवा आणि त्यानंतर पुण्यातील कार्य एका पत्रकाराच्या नजरेतून मी पाहत आलो आहे. काकांची गोव्यात झालेली उपेक्षाही जाणवत होती.

पण त्याबद्दल त्यांनी ना कधी तक्रार केली, वा ना लाचार होऊन आपले ईप्सित साध्य करून घेतले. आज या घटकेला त्यामुळेच वाटते की त्यांची झाली ती उपेक्षा खूप झाली, आता निदान त्यांना न्याय मिळावा आणि क्रांतिवीर पद्मश्री स्व. मोहन रानडे यांचे योग्य असे स्मारक या प्रदेशात व्हावे.

गोव्याच्या स्वातंत्र्याची धगधगती मशाल असा उल्लेख स्व. मोहन रानडे यांच्याबद्दल अनेकदा केला गेला आणि आजही त्यांच्यावर चार शब्द लिहिताना हे चार शब्द आपसूकच कागदावर उतरतात. ज्यांनी गोमंतभूमीसाठी अनन्वित हाल सोसले, त्या स्व. रानडे यांचे एकही स्मारक गोव्यात नसावे, याचे आश्चर्य अनेकांना वाटते. गोवामुक्ती लढ्यातील त्यांच्या सहभागावर आजही तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात एक धडा आढळतो तेवढाच, पण, त्यामुळे या क्रांतिकारकाचे कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचेल, पुढील पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरेल असे म्हणता येईल का? त्याचे उत्तर निश्चितच नकारार्थीच आहे. क्रांतिवीर मोहन रानडे आजच्या आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहावेत, त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी त्यांचे स्मारक उभारणे सरकारचेही कर्तव्य ठरते.

स्व. मोहन रानडे यांनी पुण्यात स्थायिक झाल्यानंतर स्थापन केलेल्या स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे कार्य प्रचंड मोठे असून त्यांच्या मृत्यूनंतर मागील चार-साडेचार वर्षांतही संस्थेच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचा व्याप एवढा वाढवून ठेवला आहे की त्याचे कौतुक शब्दात करता येणार नाही. शिक्षण क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत या संस्थेने मागील दोनेक दशकांत अनेकांचे भवितव्य घडवण्याचे काम केले आहे.

स्व. मोहनकाकांनी उतार वयात गोवा का सोडला, हा विषय उगाळत बसण्यात मलाही स्वारस्य नसले तरी त्यांचे गोव्यात अपुरे राहिलेले कार्य पुढे नेण्याची आज गरज आहे, अशी माझी ठाम भावना आहे आणि ती व्यक्त करताना एखादे स्मारक त्यांच्या स्मरणार्थ उभे राहिल्यास तेथूनच हे कार्य पुढे नेता येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत हा प्रस्ताव पोहोचवण्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह येथील अनेकांना यश आले आहे, पण या ना त्या कारणामुळे प्रस्तावास चालना मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मुख्यमंत्र्यांचाही या प्रस्तावास पाठिंबा असल्याने त्यांनी यात विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. चिंबल रायबंदर येथे स्व. मोहन रानडे यांच्या दशकभराच्या वास्तव्याने पावन झालेल्या सरकारी जागेतच सभागृह, ग्रंथालय अशा स्वरूपात स्मारक उभारणीतून स्व. मोहन रानडे यांच्या स्मृती कायम जपण्याचे काम सरकारला करता येईल. चिंबल भागात रानडे दाम्पत्याने गरिबांसाठी केलेल्या कार्याविषयीच्या आठवणी सांगणारे अनेक जण आजही तेथे भेटतात. चिंबल परिसराचा विकास आणि स्व. मोहन रानडे यांचे गोव्यातले अपुरे राहिलेले कार्य स्मारकाच्या उभारणीतून पुढे जावे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच सरकारला हे पवित्र काम हाती घेता येईल.

 

Web Title: ignoring of freedom fighter mohan ranade too much and now need a monument to the revolutionaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा