मालवणातील बेकायदा एलईडी मासेमारीचे प्रकरण गोव्याचे आमदार सिल्वेरा यांना महागात पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 08:19 PM2019-12-15T20:19:37+5:302019-12-15T20:19:46+5:30
ट्रॉलर प्रकरणात गोव्याचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना महाराष्ट्र महसूल अधिका-यांकडून समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे
पणजी : मालवण समुद्रात एलईडी दिवे वापरून बेकायदेशीररित्या मासेमारी करताना जप्त केलेल्या ट्रॉलर प्रकरणात गोव्याचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना महाराष्ट्र महसूल अधिका-यांकडून समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे. मासेमारीसाठी एलईडी दिवे वापरण्यास बंदी आहे. सिल्वेरा यांच्या मालकीचा वरील ट्रॉलर अशा प्रकारे मच्छिमारी करताना गस्ती नौकेवरील मच्छिमारी अधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी मालवणमध्ये पकडला होता.
ट्रॉलरवर सुमारे 60 हजार रुपये किमतीची मासळी होती. मच्छिमारी अधिका-यांनी नंतर हे प्रकरण महसूल खात्याकडे पाठवले. एलईडीद्वारे मासेमारी करणे हा गुन्हा असल्याने सिल्वेरा यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी समन्स काढले जाईल. आमदार सिल्वेरा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही.
सरकारसाठी लज्जास्पद बाब - ‘गोंयच्या रांपणकारांचो एकवोट’ची प्रतिक्रिया
दरम्यान, ‘गोंयच्या रांपणकारांचो एकवोट’ या संघटनेचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्स यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ‘
आमदार सिल्वेरा यांचा ट्रॉलर पकडला गेला ही सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. गोव्यात एलईडी मच्छिमारीबंदी अंमलात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. अशा पद्धतीने बेकायदा मासेमारी करून गोव्यातील मत्स्य धन काही जण नष्ट करतात. काही जण सिंधुदुर्गपर्यंत जातात. सिंधुदुर्गच्या मच्छीमार खात्याच्या यंत्रणेने कारवाई करून बेकायदा मासेमारीवर अंकुश ठेवला हे योग्यच झाले.’