गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे नायजेरियन अमली पदार्थाच्या व्यवसायात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 08:18 PM2017-11-27T20:18:26+5:302017-11-27T20:18:39+5:30
नायजेरियन नागरिकांची वाढती गुन्हेगारी प्रकरणे कळंगुट पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. चालू वर्षात नायजेरियन नागरीक बेकायदेशीरपणे अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतल्याची ८ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
म्हापसा : नायजेरियन नागरिकांची वाढती गुन्हेगारी प्रकरणे कळंगुट पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. चालू वर्षात नायजेरियन नागरीक बेकायदेशीरपणे अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतल्याची ८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्या सर्वांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील वैशिष्ठ म्हणजे नोंद करण्यात आलेल्या या सर्व गुन्ह्यांतील नायजेरियनांचे बेकायदेशीरपणे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी एका नायजेरियन नागरिकाकडून १ लाख ६० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
चालू वर्षात कळंगुट पोलिसांनी नायजेरियन नागरिकां विरोधात एकूण ८ अमली पदार्थ प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत. या सर्व प्रकारात त्यांच्याकडून अंदाजीत ५ लाखांहून जास्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यातील चार गुन्हे गत पर्यटन मौसमात नोंद करण्यात आले होते तर राहिलेले चार गुन्हे नवीन पर्यटन मौसमाला सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नोंद करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बहुतेक नायजेरियनांचे देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.
चालू महिन्यात बेकायदेशीर वास्तव्य तसेच अमली पदार्थाची एकूण ४ प्रकरणे कळंगुट पोलिसांनी नोंद केली आहेत. यात अंदाजीत २ लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर रोजी क्रिस ओविरीयाकडून १० हजार रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केलेला तसेच त्याच्या विरोधात बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन राहत असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला.
१२ नोव्हेंबर रोजी मिकेल ओकोरो तसेच अदेलेके खलीद या दोघांकडून २० हजार रुपये किंमतीचा गांजा ताब्यात घेण्यात आलेला. त्यांची चौकशी केली असता देशात वास्तव्यासाठी लागणारी योग्य कागदपत्रे अर्थात पासपोर्ट व व्हिजा त्यांच्याजवळ नसल्याचे आढळून आले. या दोन्ही प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले होते. सोमवारी क्रिस्तेफोर ओनीगबो या नायजेरियन नागरिकाला १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या अमली पदार्थासहित ताब्यात घेण्यात आले. केलेल्या कारवाई दरम्यान त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे एलएसडी पेपर्स तसेच ४० हजार रुपये किंमतीचा गांजा ताब्यात घेण्यात आला. कळंगुट सर्कलजवळ सदर कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली दुचाकी तसेच मोबाईल फोन सुद्धा ताब्यात घेण्यात आला. त्याला ताब्यात घेण्यासाठी कळंगुट पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. अशी माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
२५ नोव्हेंबर रोजी एका अपघातात सापडलेल्या दोघा नायजेरियांना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात मायकल ओकाफो तसेच जॉन ओकाफो यांना ताब्यात घेतले आहे. घडलेल्या या एकूण प्रकरणावरून बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन असलेले नायजेरियन नागरिक अमली पदार्थाच्या बेकायदेशीर व्यवसायात गुंतले असलयाचे दिसून आले आहे.