बेकायदा चिरेखाण; दोघा भावांवर गुन्हा, दहा लाखांचा माल चोरल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 03:56 PM2023-12-10T15:56:17+5:302023-12-10T15:56:54+5:30
मोले येथील धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
अजय बुवा, फोंडा : सांगोड-मोले येथील खासगी जागेवर बेकायदेशीरपणे चिरेखाण चालवून १० लाख रुपये किंमतीचा माल चोरी केल्याप्रकरणी कुळे पोलिसांनी जागा मालक राजेंद्र प्रभूदेसाई व त्याचे बंधू सत्यवान (सुकतळी-मोले) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
कारवाई केलेली चिरेखाण काही महिन्यांपासून बंद होती. कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सदानंद देसाई तपास करत आहेत. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी गेल्या गुरुवारी सांगोड येथील सर्वे क्रमांक ९१/४ या खासगी जागेवरील बंद असलेल्या चिरेखाणीवर छापा टाकला. ही खाण काही महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे खाणीत अधिकाऱ्यांना काहीच सापडले नाही. खासगी जागेत मोठ्या प्रमाणात चिरे काढल्याचे आढळून आल्यामुळे जागेचे मालक राजेंद्र प्रभूदेसाई व त्याचे बंधू सत्यवान प्रभूदेसाई यांच्याविरोधात खाण खात्याचे साहाय्यक संचालक सूरज कळंगुटकर यांनी पोलिसांत तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा विविध चिरेखाणींवर छापे टाकून कारवाई केल्याची नोंद आहे; परंतु प्रथमच बेकायदेशीर चिरेखाणीच्या जागेच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.