मी भाभासूमंसोबत पण नव्या संघात नाही - लेले
By admin | Published: September 1, 2016 09:46 PM2016-09-01T21:46:12+5:302016-09-01T21:46:12+5:30
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज्ञाधारक स्वयंसेवक आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 1 - मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज्ञाधारक स्वयंसेवक आहे. मी पूर्णपणे भारतीय भाषा सुरक्षा मंचसोबत सक्रियपणे होतो व राहीन. मात्र प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या बंडखोरांच्या नव्या संघासोबत मी नाही, असे रत्नाकर लेले यांनी गुरुवारी येथे सांगितले.
लोकमतशी बोलताना लेले म्हणाले, की प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हायला हवे व इंग्रजी शाळांचे अनुदान बंद व्हायला हवे म्हणून भाषा सुरक्षा मंचाने जी चळवळ सुरू केली आहे, त्या चळवळीला व त्या विषयाला माझा पाठिंबा आहे. मात्र नव्या राजकीय पक्षाशी मी स्वत:ला जोडून घेणार नाही. तसेच गोव्यापुरताच म्हणून जो नवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंडखोरांनी स्थापन केला आहे, त्या संघासोबतही मी नाही.
लेले म्हणाले, की बांबोळी-कुजिरा येथे जी बैठक झाली, ती बैठक संघाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठीच होती. पण त्यात बरेच स्वयंसेवकही आले. ज्यांच्याकडे स्वयंसेवकपद वगळता संघाची अन्य कोणती जबाबदारी नाही. वास्तविक वेलिंगकर यांना कोंकण प्रांताने गोव्याच्या संघचालक पदावरून काढले नव्हते. त्यांना पदावरून हटविले असे म्हणणेही गैर आहे. त्यांना भारतीय भाषा सुरक्षा मंचचे काम अधिक स्वतंत्रपणे करता यावे म्हणून संघाच्या जबाबदारीतून मुक्त केले गेले आहे. भाषा सुरक्षा मंचला राजकीय पक्ष स्थापन करावा लागत आहे. ती आंदोलनाची गरज आहे. तो स्थापन करावा पण संघचालक पदावर राहून ते काम करता येणार नाही. तसे करूही नये म्हणून वेलिंगकर यांनी स्वत:हून संघचालक पद सोडावे व त्यांनी भाषा सुरक्षा मंचाचे व नव्या राजकीय पक्षाचे काम करावे असे अपेक्षित होते. तथापि, वेलिंगकर यांनी स्वत:हून पद सोडले नाही. मला वेलिंगकर यांच्याबाबत अत्यंत आदर आहे. कारण ते चांगले स्वयंसेवक आहेत पण मी त्यांच्या नेतृत्वाखालील आताच्या नव्या संघाचा भाग नाही.