गोव्यात मूर्तीकारांची दिवाळी, तब्बल १३ महिन्यांनंतर गणेश मूर्तीकारांना मिळाली सबसिडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 06:35 PM2017-10-17T18:35:05+5:302017-10-17T18:35:13+5:30
गणेश मूर्तीकारांना तब्बल तेरा महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सरकारकडून सबसिडी मिळाली.
पणजी - गणेश मूर्तीकारांना तब्बल तेरा महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सरकारकडून सबसिडी मिळाली. गुरुवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश पाटणेकर यांच्या हस्ते बार्देसमधील १८ आणि डिचोली तालुक्यातील ६३ मूर्तीकारांना सबसिडीचे धनादेश देण्यात आले. उर्वरित तालुक्यांमधील मूर्तीकारांच्याही बँक खात्यात लवकरच सबसिडीची रक्कम जमा केली जाईल.
पारंपरिक मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी मूर्तीमागे १00 रुपये याप्रमाणे सबसिडी दिली जाते. गेल्या वर्षी ४७३ मूर्तीकारांनी ५३,३८४ मूर्तींसाठी सबसिडीकरिता अर्ज केले होते मात्र यंदाची चतुर्थी उलटून गेली तरी मूर्तीकरांच्या हाती काही पडले नव्हते. महामंडळाकडून याबाबत सरकारकडे पाठपुरावा चालू होता. सरकारने २0१६ च्या चतुर्थीत मूर्ती बनविलेल्या मूर्तीकारांना ५३ लाख ३८ हजार सबसिडी मंजूर केली. त्याचे वितरण मंगळवारी झाले.
एका अधिकाऱ्याने विशद केले ते असे की, चतुर्थीनंतर महिनाभराने अर्ज स्वीकारले जातात. मूर्तीनिहाय साधारणपणे ५५ हजार अर्ज तपासण्याच्या कामात तीन-चार महिने जातात. बार्देसमधील १८ मूर्तीकारांना २ लाख २0 हजार ९00 रुपये तर डिचोलीतील ६३ मूर्तीकारांना ९ लाख ३१ हजार रुपये मंगळवारी वितरित करण्यात आले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यानंतर पाण्यात लवकर विरघळत नाहीत आणि त्यातून प्रदूषण होते त्यामुळे पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. पारंपरिक मूर्तीकारांना चिकणमातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी योजना आहे.