मला तिकीट नाकारण्याबाबत बोलतात ते अपरिपक्व: श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 03:27 PM2023-05-11T15:27:13+5:302023-05-11T15:28:06+5:30
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावर माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता त्यांनी वरील भाष्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभेचे तिकीट कोणाला द्यावे, याचा निर्णय भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळ घेत असते. मी निवडणूक लढण्यास इच्छुक आणि तयारीही सुरू केली आहे. जे कोणी तिकिटाबद्दल बोलतात ते अपरिपक्व आहेत, अशी प्रतिक्रिया उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावर माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता त्यांनी वरील भाष्य केले. ते म्हणाले की, विद्यमान खासदाराला तिकीट नाकारण्यासाठी काही तरी कारण हवे किंवा उमेदवाराच्या काहीतरी त्रुटी असायला हव्यात. तसे काहीही झालेले नाही.' 'जे कोणी मला तिकीट नाकारण्याबाबत बोलतात ते अपरिपक्व आहेत आणि या बोलण्याला कोणताही आधार नाही, असे श्रीपाद म्हणाले.
परुळेकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप श्रीपाद नाईक यांना जर उमेदवारी देणार नसेल तर पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून माझा तिकिटावर दावा असेल, असे म्हटले होते.
साखळी येथील विजय सभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना तिकीट दिले जाईल, असे संकेत दिले. लोकांनी श्रीपादभाऊंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.