आरोपींना त्वरित अटक करा

By admin | Published: August 24, 2015 01:58 AM2015-08-24T01:58:39+5:302015-08-24T02:01:17+5:30

पर्वरी : नेरूल येथील कालीमाता मंदिर तोडफोड प्रकरणाला तीन दिवस झाले; परंतु अजूनपर्यंत संबंधित दोषीला पकडण्यास पोलिसांना अपयश आल्याचा रोष

Immediately arrest the accused | आरोपींना त्वरित अटक करा

आरोपींना त्वरित अटक करा

Next

पर्वरी : नेरूल येथील कालीमाता मंदिर तोडफोड प्रकरणाला तीन दिवस झाले; परंतु अजूनपर्यंत संबंधित दोषीला पकडण्यास पोलिसांना अपयश आल्याचा रोष येऊन नेरूल ग्रामस्थांनी जाब विचारण्यासाठी पर्वरी पोलीस स्थानकावर गर्दी केली.
स्थानकाबाहेरील गर्दी पाहून त्यांना पोलिसांनी गेटबाहेरच अडवून आत जाण्यास मज्जाव केला. संशयित आरोपी सावियो आणि कालीमातेचे मंदिर तोडून आतील मूर्ती पळवून नेणाऱ्यास अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत होते. कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी मामलेदार मधु नार्वेकर यांनी जमावाला तेथून हटविण्याचे पोलिसांना आदेश दिले. ग्रामस्थांपैकी पाच जणांच्या शिष्टमंडळाला आत बोलणी करण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या शिष्टमंडळात विनायक मयेकर, चंदन शिरोडकर, शशिकला गोवेकर, बाप्पा कोरगावकर आणि शिवानंद नाईक यांचा समावेश होता.
उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी शिष्टमंडळाला तपास चालू असून लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी पर्वरी पोलीस स्थानकापाशी येऊन तणावाचे वातावरण निर्माण केले होते. मामलेदार नार्वेकर यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला व पोलिसांना जमावास हटविण्याचे आदेश दिले. या वेळी पोलीस स्थानकापाशी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साहा. मामलेदार परेश निपाणीकर, निरीक्षक ब्रेंडन डिसोझा, तुषार वेर्णेकर, नीलेश राणे, परेश नाईक, निनाद देऊलकर आणि जिवबा देसाई हे या वेळी उपस्थित होते. बंदोबस्तासाठी म्हापसा, पेडणे, कळंगुट व अन्य ठिकाणाहून पोलीस कुमक मागविण्यात आली होती.
दरम्यान, आज सकाळी नेरूल पंचायतीची ग्रामसभा वादळी ठरली. या ग्रामसभेत प्रामुख्याने मंदिर तोडफोड प्रकरण हा विषय मांडण्यात आला. या सभेत पुढील ठराव मंजूर करण्यात आले. मंदिराकडील जमीन केवळ गावाच्या हितासाठी वापरावी, जमीन हस्तांतरप्रकरणी सीबीआयकडे तक्रार नोंदविणे, डॉन बॉस्को संस्थेला इंचभर जमीन न देणे आणि संशियत सावियो आणि इतर गुन्हेगारांना ४८ तासांच्या आत अटक करावयास पोलिसाना सांगणे. काही ग्रामस्थांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Immediately arrest the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.