म्हादईप्रश्नी स्थापन केलेली सभागृह समिती त्वरित विसर्जित करा: विजय सरदेसाईंचा आरोप
By पूजा प्रभूगावकर | Published: March 5, 2024 12:22 PM2024-03-05T12:22:46+5:302024-03-05T12:23:01+5:30
म्हादईचा विषय सक्षमपणे हाताळण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आहे. याप्रश्नी गोवा सरकारने एकप्रकारे कर्नाटक समोर शरणागती पत्करली आहे, असा आरोप
पणजी: गोवा सरकार ज्या पध्दतीने म्हादईचे प्रकरण हाताळत आहे, ते अत्यंत धक्कादायक आहे. म्हादईप्रश्नी स्थापन केलेली सभागृह समितीची बैठकच होत नसल्याने सरकारने त्वरित विसर्जित करावी अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
म्हादईचा विषय सक्षमपणे हाताळण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आहे. याप्रश्नी गोवा सरकारने एकप्रकारे कर्नाटक समोर शरणागती पत्करली आहे.पाण्यापेक्षा गोव्यातील भाजप सरकार कर्नाटकमधील लोकसभेच्या २८ जागा महत्वाच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.
म्हादई ही गोव्याची जीवनदायीनी आहे. त्यावरील पाण्यावर लाखो गोमंतकीय अवलंबून आहेत.म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यास गोव्यात पाणी टंचाई निर्माण होईल. नळ कोरडे होतील, सर्वसामान्यांना त्याचा फटका बसेल असा इशारा आपण सरकारला यापूर्वीच दिला होता.गोव्याला या गंभीर समस्येला तोंड देता येऊ नये यासाठी या सर्वावर विचार विनिमय करुन तोडगा काढण्यासाठी म्हादई प्रश्नी स्थान केलेल्या सभागृह समितीची बैठक बोलवावी अशी मागणी आपण सरकारला केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.