व्यसनाच्या आहारी न जाता कलेत आत्ममग्न व्हा: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 11:13 AM2024-03-12T11:13:44+5:302024-03-12T11:14:47+5:30
स्वरसंगम कला मंदिरातर्फे महिला दिन.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कला हे एक व्यसन म्हणून आत्मसात करा. त्यात रममाण व्हा आणि वाईट व्यसनाच्या आहारी न जाता कलेच्या व्यसनात अधीन व्हा. कलेत आत्ममग्न व्हा आणि आत्मानंद मिळवा, कला मग ती कोणतीही का असेना, ती तुम्हाला यश मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. पण, आपल्या कलेशी प्रामाणिक राहा, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
स्वरसंगम कला मंदिर या संस्थेने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, पणजी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून पत्रकार, सूत्रसंचालक राधिका कामत सातोस्कर, स्वरसंगम कला मंदिराचे अध्यक्ष रामचंद्र प्रभू शिरोडकर, उत्सवमूर्ती सिया अतुल पंडित, प्रेरणा पालेकर आणि विराज वाडेकर यांची उपस्थिती होती.
कला ही सहसा कुणाला मिळत नाही. या कलेचा योग्य वापर करून त्यात तन-मन अर्पण करून काम केल्यास नावलौकिक मिळायला वेळ लागत नाही. पण, कोणत्याही कलेत रियाज हा जसा महत्त्वाचा घटक असतो, तशीच आवडही असावी लागते. कलाकारांनी मनात जिद्द आणि चिकाटी बाळगून वाटचाल करीत राहावे, असे आवाहनही मंत्री नाईक यांनी केले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करीत राहिलात तर पदरात यश नक्कीच मिळेल, असे राधिका सातोस्कर यांनी सांगितले.
तेजस्विनी पुरस्कार प्रदान
यावेळी मंत्री नाईक यांच्या हस्ते चित्रकार सिया पंडित, कथ्थक नर्तक आणि कला सुधा प्रांगणच्या संस्थापक प्रेरणा पालेकर यांना महिला दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजश्री कामत यांनी स्वागत केले.