सिंधुदुर्ग, कारवारच्या मासळी व्यापा-यांसाठी गोवा सरकारकडून आयात निर्बंध शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 06:46 PM2018-12-17T18:46:26+5:302018-12-17T18:46:42+5:30
गोव्यापासून ६0 किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या शेजारी सिंधुदुर्ग, कारवारच्या मासळी आयातीवरील निर्बंध गोवा सरकारने शिथिल केले आहेत. या भागातून चारचाकी वाहनांमधून गोव्यात विक्रीसाठी मासळी आणता येईल.
पणजी : गोव्यापासून ६0 किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या शेजारी सिंधुदुर्ग, कारवारच्या मासळी आयातीवरील निर्बंध गोवा सरकारने शिथिल केले आहेत. या भागातून चारचाकी वाहनांमधून गोव्यात विक्रीसाठी मासळी आणता येईल. इन्सुलेटेड वाहन नसलेल्या व्यापा-यांनी वाहतुकीच्यावेळी पुरेसा बर्फ वापरणे सक्तीचे आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या आदेशावर सह्या झाल्या असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले की, गोव्यापासून जवळ असलेल्या आणि तासाभरात येथे पोचणा-या शेजारी सीमाभागातील छोट्या मासळी व्यापा-यांनाच ही सवलत आहे. या मासळी व्यापा-यांना गोव्याच्या मासळी विक्रेत्यांप्रमाणेच गणले जाईल परंतु त्यांनी पुरेसा बर्फ तसेच अन्य गोष्टींची सतर्कता बाळगावी लागेल. मोठ्या मासळी व्यापा-यांनी या सवलतीला गैरफायदा घेऊ नये यासाठी तूर्त चार चाकी लहान वाहनांनाच मुभा असेल. गोवा सरकारने मासळी आयातीवर कडक निर्बंध लागू केल्यानंतर गेले काही दिवस सिंधुदुर्ग कारवारमधून येणारी मासळी बंद झाली होती. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातील मासळी व्यापा-यांना तर कर्नाटकचे महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी कारवार, उडुपीच्या मासळी व्यापा-यांना याबाबतीत शिथिलता द्यावी, अशी मागणी गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु अनेक दिवस यावर तोडगा न निघाल्याने शुक्रवारी गोव्याचे मासळीवाहू ट्रक कारवारमध्ये अडविण्यात आले. इकडे स्थानिक मच्छिमारांनीही एफडीए अधिका-यांना घेराव घातला त्यामुळे मासळी आयात निर्बंध वादाला नवे वळण लागले होते. आज सकाळी राजधानी शहरातील मासळी बाजार बंद ठेवून मिरामार येथे आरोग्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानी मोर्चा नेण्यासाठी मासळी विक्रेते जमले मात्र पोलिसांनी त्यांना मिरामार सर्कलजवळ अडविले. त्यानंतर मासळी व्यापा-यांचे एक शिष्टमंडळाने पर्वरी येथे मंत्रालयात विश्वजित यांना भेटले. सकाळी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर सायंकाळी वरील आदेश काढण्यात आला.