भारत-रशिया परिषदेत महत्त्वाचे करार शक्य
By Admin | Published: October 15, 2016 03:40 AM2016-10-15T03:40:33+5:302016-10-15T03:40:33+5:30
पाच राष्ट्र प्रमुखांच्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या शनिवारच्या पहिल्या दिवशी भारत व रशिया यांच्यातील द्विपक्षीय वार्षिक परिषद बाणावली येथे ताज एक्झॉटिकामध्ये होणार असून या वेळी
सुशांत कुंकळयेकर / मडगाव (गोवा)
पाच राष्ट्र प्रमुखांच्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या शनिवारच्या पहिल्या दिवशी भारत व रशिया यांच्यातील द्विपक्षीय वार्षिक परिषद बाणावली येथे ताज एक्झॉटिकामध्ये होणार असून या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात होणाऱ्या चर्चेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा मुख्य मुद्दा असण्याची शक्यता आहे. ही माहिती भारताचे रशियातील राजदूत पंकज सरन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
रशिया व भारत यांच्यातील या परिषदेदरम्यान कुडनकुलम अणुप्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या पायाभरणीविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच ऊर्जा, साधनसामग्री, रेल्वे, कृषी, दूरसंचार आदी क्षेत्रांत महत्त्वाचे करार होण्याचे संकेत सरन यांनी दिले. या पत्रकार परिषदेस परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप तसेच युरोशिया विभागाचे संयुक्त सचिव जी. व्ही. श्रीनिवास उपस्थित होते.
सरन म्हणाले, ब्रिक्स देश एकत्र आणण्यासाठी रशियाने घेतलेली भूमिका महत्त्वाची होती. यंदा भारत-रशिया मैत्रीला ७0 वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वाची ठरेल. भारताशी संबंध वाढविण्यास तसेच आर्थिक क्षेत्राचा विस्तार करण्यास आजच्याएवढा रशिया कधीच आक्रमक नव्हता. त्यामुळे या परिषदेत मोदी व पुतीन महत्त्वाचे करार करणार आहेत. रशिया हा भारताचा सामारिक भागीदार असून हेलिकॉप्टर बांधण्याच्या प्रकल्पांबरोबरच ऊर्जा, साधनसामग्री, रेल्वे, कृषी, उच्च तंत्रज्ञान यासंदर्भात महत्त्वाचे करार शनिवारी होणार आहेत.