मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय, महिलांना रात्रीच्यावेळी काम करण्यास मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:49 PM2019-06-26T18:49:59+5:302019-06-26T18:50:36+5:30
उद्योगांमध्ये सध्या रात्रीच्यावेळी महिलांसाठी शिफ्ट असत नाही. एकदा विधानसभेत दुरुस्ती विधेयक संमत झाले
पणजी : गोव्यातील उद्योगांमध्येही महिलांना रात्रीच्यावेळी काम करायला मिळणार आहे. कारखानेविषयक कायद्यात तशी दुरुस्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, महिलांना रात्रीच्यावेळी काम करण्याची मुभा देण्यापूर्वी संबंधित उद्योगाकडे वाहतूक व्यवस्था व अन्य सुविधा आहेत की नाही हे कारखाने व बाष्पक निरीक्षकालय तपासून पाहणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची तिसरी बैठक बुधवारी पार पडली. त्यावेळी कारखाने कायद्यात दुरुस्ती करण्याचा विषय आला. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे हे खाते आहे. विधानसभेच्या येत्या अधिवेशनात दुरुस्ती विधेयक येणार आहे. कारखाने कायद्याचे कलम 66 दुरुस्त केले जाईल. अधिवेशनास 15 जुलै रोजी आरंभ होणार आहे.
उद्योगांमध्ये सध्या रात्रीच्यावेळी महिलांसाठी शिफ्ट असत नाही. एकदा विधानसभेत दुरुस्ती विधेयक संमत झाले व त्याविषयीची अधिसूचना जारी झाली की, मग सायंकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेर्पयत महिला कामगार किंवा कर्मचारी उद्योगात काम करू शकतील. महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने उद्योगात उपाययोजना असायला हवी. उद्योगात सुरक्षित वातावरण असावे तसेच महिला कर्मचा:यांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था असावी असेही अपेक्षित आहे. कायदा दुरुस्त झाला म्हणजे लगेच सर्व उद्योगांमध्ये महिलांना रात्रीच्यावेळी काम करता येईल असे नव्हे तर उद्योगांमधील स्थिती पाहून मंजुरी दिली जाईल, असे कारखाने व बाष्पक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कारखाने कायद्यात अन्यही काही दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. सध्या आठवडय़ाला 72 तास कर्मचाऱ्यांनी काम करावे असे अपेक्षित आहे. कामाची हे तास वाढविलेही जाऊ शकतात, अशी माहिती मिळाली.