सोनाली फोगट हत्याप्रकरणी महत्वाचे पुरावे; पोलीस तपासात पुढे आली बाटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:57 PM2022-09-01T16:57:11+5:302022-09-01T16:58:30+5:30
आतापर्यंत गोवा पोलिसांनी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासहीत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे
पणजी: भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गोवापोलिसांचे चार सदस्यीय पथक बुधवारी हरियाणामध्ये पोहोचले. या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी पथक प्रथम येथील सदर पोलीस ठाण्यात आणि नंतर येथील फोगट यांच्या फार्म हाऊसवर गेले. यादरम्यान अनेक पुरावे हाती लागले आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली. हणजुणे येथील कर्लीस रेस्टॉरंट पोलिसांनी सील केले होते. यादरम्यान गुरुवारी तपासणी सुरु असताना अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच येथे एका बॉटलमध्ये ड्रग्सही आढळले आहेत. प्रत्येक बाजुने तपास सुरु असून, दोषींवर योग्य ती कारवाई करु, असे आश्वासन पोलिस अधिक्षक सक्सेना यांनी दिले.
आतापर्यंत गोवा पोलिसांनी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासहीत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. या पाच जणांची कसून चौकशी सुरु आहे. तसेच हिसार पोलिसांच्या संपर्कात आम्ही आहाेत. लवकरच काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे, असे सक्सेना यांनी अधिक माहिती देताना सांगितले. आणखी एका घडामोडीत, मंगळवारी हिसार पोलिसांनी फोगटच्या फार्महाऊसमधून सीसीटीव्हीचा डीव्हीआर, लॅपटॉप आणि इतर कागदपत्रांसह गायब झालेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. फोगट यांच्या कुटूंबियाने फार्म हाऊसमधून लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर आणि काही कागदपत्रे चोरीला गेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली होती, या तक्रारीनंतर हिसार पोलिसांनी चौकशी सुरु केली होती.
सुधीर सांगवान याचा शिवम नामक सहाकाऱ्याने दि. २३ ऑगस्ट रोजी तिच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर फार्महाऊसमधून या वस्तू नेल्या, असा दावा सोनालीच्या कुटूंबियाने केला आहे. तीच्या कुटूंबियाने हिसारचे पोलीस अधीक्षक लोकेंद्र सिंग यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच सोनाली फोगटची किशोरवयीन मुलगी यशोधरा हिने मंगळवारी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली.