म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 08:43 PM2018-10-22T20:43:30+5:302018-10-22T20:44:12+5:30
म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने सुमारे दीड महिन्यापूर्वी सादर केलेले राजीनामे स्वीकारण्यास केंद्रीय सहकार निबंधकाने असमर्थता दशवल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालयात संपन्न होत आहे.
म्हापसा : म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने सुमारे दीड महिन्यापूर्वी सादर केलेले राजीनामे स्वीकारण्यास केंद्रीय सहकार निबंधकाने असमर्थता दशवल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालयात संपन्न होत आहे.
केंद्रीय सहकार निबंधकाने बँकेला पत्र पाठवून संचालक मंडळाने सादर केलेले राजीनामे वैयक्तीक पातळीवर असल्याने ते स्वीकारण्याचा अधिकार आपल्याजवळ नसल्याचे कळवले होते. त्यामुळे सदर राजीनाम्यावर संचालक मंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा. गरज पडल्यास पुन्हा निवडणुका घेवून नवीन संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत संचालक मंडळावर कायम रहावे अशी सुचना त्यात केली होती. केलेल्या सुचनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनवर निर्बंध लागू केल्यानंतर ४ सप्टेंबर रोजी सर्व संचालक मंडळाने आपले राजीनामे सादर केले होते. केलेल्या राजीनाम्याची प्रत केंद्रीय सहकार निबंधक, रिझर्व्ह बँक, राज्य सरकार तसेच राज्य सहकार निबंधकाना पाठवण्यात आली होती. राजीनाम्यानंतर बँकेची वादळी सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर रोजी सुद्धा संपन्न झाली होती. सभेनंतर राजीनामे स्वीकारले जातील अशी सर्वांची अपेक्षा होती, ती या पत्रानंतर फोल ठरली.
प्राप्त माहितीनुसार बँकेचे अध्यक्ष गुरुदास नाटेकर तसेच शैलेश सावंत यांनी मुंबईत जावून केंद्रीय निबंधकाच्या अधिकाºयांची भेट घेतलेली व बँकेच्या प्रश्नावर चर्चा केली होती. या संबंधी बँकेचे सरव्यवस्थापन शैलेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता या संबंधी केंद्रीय सहकार निबंधकाकडून पत्र आल्याचे त्यांनी मान्य केले. सर्व संचालक मंडळाने आणिबाणीच्या स्थितीत आपले राजीनामे सादर केले. उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत केंद्रीय सहकार निबंधकाच्या पत्रवार तसेच नव्याने निवडणुका घेण्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व भागधारकांचे तसेच हितचिंतकांचे बैठकीवर लक्ष लागून राहिले आहे.