खाण घोटाळ्यातील आरोपी इम्रानची एकाच बँकेत ५३० खाती, लुटीचा पैसा लपविण्यासाठी नवे तंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 09:28 PM2017-11-02T21:28:07+5:302017-11-02T21:28:20+5:30
पणजी: बेकायदेशीरपणे खनिज उद्योग करणारा इम्रान खान याने आपली घोटाळ्यातील १०० कोटी रुपयांहून अधिक लूट लपविण्यासाठी मडगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एकाच शाखेत ५३० खाती खोलली होती.
पणजी: बेकायदेशीरपणे खनिज उद्योग करणारा इम्रान खान याने आपली घोटाळ्यातील १०० कोटी रुपयांहून अधिक लूट लपविण्यासाठी मडगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एकाच शाखेत ५३० खाती खोलली होती. एसआटीपासून लपविण्यासाठी रक्कम एका खात्यातून काढून दुस-या खात्यात टाकण्याचे काम तो सातत्याने करीत होता.
बेकायदेशीर खाण घोटाळ्यात अडकलेल्या इम्रान खानच्या १०० कोटी रुपयांहून अधिक कायम ठेवी असल्याचे एसआयटीच्या छाप्यातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांतून उघड झाले होती. कायम ठेवीच्या रुपात त्यांनी हे पैसे मडगावच्या बँकेत ठेवले होते. त्या पैकी ६० कोटी रुपयांच्या ठेवी गोठविण्यासाठी एसआयटीला यश आले आहे. ऊर्वरीत पैशांचाही पत्ता लावण्याच्या प्रयत्नात एसआयटी आहे. तपासादरम्यान इम्रानने ५३० खाती बँकेत खोलली होती. एका खात्यातून दुस-या खात्यात पैसे हलविण्याचे काम सायीप्राणे तो करीतच होता अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
एरव्ही एकाच बँकेत एक खाते असताना त्याच बँकेत दुसरे खोलायचे असल्यास बँक अधिका-यांकडून १०० प्रश्नांचा भडिमार केला जातो. तसे करूनही दुसरे खाते खोलले जाणारच याचा भरवसा नसतो. इथे तर इम्रानकडून ५३० खाती खोलली आहेत. म्हणजेच केवळ बँकेचा फायदा होतो या एकमेव कारणासाठी बँकेने त्याला खाती खोलून दिली. बँक अधिका-यांचे हे व्यवहार संशयाच्या घे-यात आले असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.
इम्रानने बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर खनिज मालाचे उत्खनन करून त्याची विक्री करण्यात आल्याचे उघडकीस आल्यामुळे एसआयटीकडून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पणजी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणात इम्रानविरुद्ध भक्कम पुरावे सापडल्याचा एसआयटीचा दावा आहे. मारिया फिगेरिडो यांना मंजूर झालेले टीसी क्रमांक ६५/५१ चे खाणलीज हा इम्रान खान चालवित होता. त्याच्याकडून पावर आॅफ एटर्नी त्याने घेतली होती. २००७-२०१२ या काळात त्याने कोट्यवधी रुपये किंमतीच्या खनिज मालाचे उत्खनन करून त्याची निर्यात केल्याचा एसआयटीचा दावा आहे.