राजधानी पणजीत अखेर खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2024 08:37 AM2024-08-19T08:37:49+5:302024-08-19T08:39:00+5:30
पाऊस ओसरल्यानंतर हॉटमिक्स होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रविवार सुट्टीच्या दिवशी पावसानेही उघडीप दिल्याने पणजीत रस्त्यावरील खड्डे काँक्रिट घालून भरण्याचे काम जोरात सुरू होते. गेले दोन महिने मुसळधार पावसामुळे हे खड्डे बुजवायला मुहूर्त मिळत नव्हता.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पणजी राजधानीत स्मार्ट सिटीचे काम सुरु होते. विविध पाईलाईन घालण्याचे काम सुरु होते. यासाठी पणजीतील बहुतांश रस्ते खोदण्यात आले होते. पण जोराचा पाऊस झाल्याने या खड्ड्यात घातलेले डांबर वाहून गेले. डांबर बाहेर पडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. या खड्यात अनेक लोक पडून जखमी झाले. अनेकांचे कंबरडे मोडले. लोकांची वाहने मोडकळीस आली. त्यामुळे याला लोकांकडून विरोध होत असल्याने आता कुठेतरी जाग आली आहे.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी लोक खड्ड्यात पडून जखमी झाल्यास कंत्राटदार तसेच अभियंत्यांना जबाबदार धरणार असे मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याने आता या कामाला वेग आला आहे. कंत्राटदाराकडून आता पुन्हा हे खड्डे बुजविले जात आहेत. पण राजधानीत वाहनांची वर्दळ असल्याने खड्ड्यात काँक्रीट घालण्यात अडथळा येत आहे. घातलेले काँक्रीट पुन्हा बाहेर पडत आहे.
राजधानी पणजीत तर पावसापूर्वी स्मार्ट सिटीचे काम सुरू होते. त्यांनी घाईगडबडीत डांबर तसेच काँक्रिटने खड्डे बुजविले होते. पण पावसात पुन्हा वाहून गेल्याने अनेक रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. भाटले, नेवगीनगर, मळा, १८ जून रस्ता पणजी बसस्थानक बसस्थानक तसेच अन्य विविध रस्त्यावर असे मोठमोठे खड्डे पडले आहेत. आता पुन्हा पावसाचा जोर कमी असल्याने पुन्हा हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. बसस्थानकावर तर मोठे पेव्हर्स घालून हे खड्डे बुजविले आहेत. पण आता पुन्हा पाऊस आला तर हे घातलेले काँक्रिट बाहेर पडणार तर नाही ना? असा प्रश्न या लोकांना पडला आहे