गुप्त मतदान झाल्यास फोंड्यात भाजपला बसू शकतो 'धक्का'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2024 10:54 AM2024-07-08T10:54:19+5:302024-07-08T10:55:30+5:30

नगराध्यक्ष निवड : वीरेंद्र ढवळीकर मगोकडून होऊ शकतात लक्ष्य

in case of secret voting bjp may get a shock in the ponda goa | गुप्त मतदान झाल्यास फोंड्यात भाजपला बसू शकतो 'धक्का'

गुप्त मतदान झाल्यास फोंड्यात भाजपला बसू शकतो 'धक्का'

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : अलिखित करारानुसार येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी अखेर शनिवारी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नव्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून वीरेंद्र ढवळीकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. वीरेंद्र ढवळीकर यांनी मगोतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे तो वचपा काढण्यासाठी सुद्धा मगोचे नगरसेवक मोर्चेबांधणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पदासाठी गुप्त मतदान झाले तर अनपेक्षित निकाल लागू शकतो.

ठरल्याप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी रितेश नाईक यांचा पदाचा राजीनामा अपेक्षित होता. मात्र, राजीनामा देण्यास चालढकल होत असल्याचे लक्षात येताच भाजपच्याच गोटात चलबिचलता निर्माण होऊ लागली. कारण रितेश नाईक राजीनामा देण्यास जेवढे जास्त दिवस घेतील तेवढे दिवस पुढील नगराध्यक्षांचा कार्यकाळ कमी होत होता. एका बाजूने मगोचे चार व एक अपक्ष नगरसेवक असताना, भाजपच्याच १० नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुद्धा सुरू केली होती. हे प्रकरण भाजपच्या हाय कमांडपर्यंत सुद्धा पोहोचले होते. 

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर रितेश नाईक राजीनामा देतील, असे मूळ भाजपच्या नगरसेवकांना वाटले होते. मात्र लोकसभा निवडणुका होऊन निकाल लागला तरीही नाईक यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे मूळ भाजपचेच काही नगरसेवक नाराज झाले होते. सध्या मूळ भाजपचे विश्वनाथ दळवी, शौनक बोरकर, वीरेंद्र ढवळेकर, दीपा कोलवेकर हे चार नगरसेवक आहेत तर रवी नाईक यांच्या गटात आनंद नाईक, रूपक देसाई, ज्योती नाईक, रितेश नाईक, रॉय नाईक, विद्या पुनळेकर हे सहा नगरसेवक आहेत. हे या सहाही नगरसेवकांचा रितेश यांना पाठिंबा होता. परंतु, मगोला हाताशी धरून मूळ भाजपमधील तो गट अविश्वास ठराव आणू शकतो, अशी भीती निर्माण झाल्याने कदाचित भाजपच्या नेत्यांनी मोर्चा सांभाळला असेल, तशी शक्यता नाकारता येत नाही. कारण मगोचे चार, एक अपक्ष व चार असंतुष्ट नगरसेवक जर एक झाले असते तर अविश्वास ठराव दाखल होऊ शकला असता.

नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पणजी येथे एक बैठक झाली होती. त्या बैठकीत रितेश नाईक यांच्यानंतर विश्वनाथ दळवी यांना नगराध्यपद देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. मात्र, विश्वनाथ दळवी यांनी मोठ्या दिलाने मगोमधून भाजपमध्ये आलेले वीरेंद्र ढवळीकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी सुचवले.

पक्षश्रेष्ठींनी त्यांना मान्यतासुद्धा दिली. वीरेंद्र नंतर उर्वरित तीन नगराध्यक्षसुद्धा तिथे ठरलेले आहेत. वीरेंद्र ढवळीकर हे पुढील नगराध्यक्ष असतील असे जरी गृहीत धरले तरी मागील दहा वर्षांचा इतिहास पाहता नगरपालिकेच्या राजकारणात कधी भूकंप येईल, हे सांगता येत नाही.

....तर मगोची भूमिका ठरणार महत्त्वाची

ऐनवेळी दगाबाजीचे राजकारण येथे होऊ शकते. त्यामुळे मतदान झाले तर मगोच्या चार व एक अपक्ष नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गुप्त मतदान झाले तर काहीही होऊ शकते. अपक्ष दादा नाईक यांना जर नगराध्यक्षपदासाठी मगोने पुढे केले तर यांच्याकडे पाच नगरसेवकांचे बळ मिळेल. त्या बाजूने तीन नगरसेवक गुप्त मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजप यावेळी ताकसुद्धा फुंकून पिणार हे निश्चित आहे.

 

Web Title: in case of secret voting bjp may get a shock in the ponda goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.