वास्को: बुडणाऱ्या जहाजातील १९ जणांना तटरक्षक दलाने दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 12:01 AM2022-09-17T00:01:19+5:302022-09-17T00:02:31+5:30
जहाज बुडून त्याच्यावरील १९ सदस्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी माहीती तटरक्षक दलाच्या जवानांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: रत्नागीरी येथील खोल समुद्रात ‘एमटी पार्थ’ जहाज बुडायला लागल्याने त्याच्यावरील १९ सदस्यांचा जीव धोक्यात असल्याची माहीती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी जहाजासहीत त्वरित तेथे पोचून त्यांना आपल्या जहाजात घेऊन त्यांचा जीव वाचविला. तटरक्षक दलाने बुडणाऱ्या जहाजावरील वाचवलेल्या १९ सदस्यांना घेऊन ते शनिवारी (दि.१७) सकाळी ते गोव्याच्या मुरगाव बंदरात पोचणार असल्याची माहीती प्राप्त झाली.
मुरगाव बंदरापासून काही दूर समुद्रात गस्तीवर असलेल्या तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस सुजीत’ जहाजावरील जवानांना शुक्रवारी (दि.१६) सकाळी १०.४५ वाजता त्याबाबत माहीती मिळाली. रत्नागीरी, महाराष्ट्रा येथील समुद्रात ‘एमटी पार्थ’ नामक जहाजाला (मरचंट नेवी वेसल) गळती लागून जहाजाच्या आत मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला लागले. यामुळे जहाज बुडून त्याच्यावरील १९ सदस्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी माहीती तटरक्षक दलाच्या जवानांना मिळाली.
ते जहाज मुरगाव बंदरापासून ८० नोटीकल मैल खोल समुद्रात असल्याचे तटरक्षक दलाच्या जवानांना कळताच त्यांनी त्वरित दलाच्या ‘आयसीजीएस सुजित’ जहाजासहीत रत्नागीरी येथे त्या १९ जणांच्या बचावासाठी कुच केली. ‘आयसीजीएस सुजित’ जहाजात १९ जणांना वाचवण्यासाठी गेलेल्या दलाच्या जवानांना ह्या कार्यात सहकार्यासाठी तटरक्षक दलाने त्यांच्याबरोबर ‘आयसीजीएस अपूर्व’ जहाज आणि ‘सीजी ध्रुव’ हेलिकॉप्टर पाठवले. खराब हवामानामुळे खवाळलेल्या समुद्राची आणि भयंकर वाऱ्याची परवा न करता तटरक्षक दलाचे जवान त्या १९ जणांच्या बचावासाठी निघाल्यानंतर अखेरीस रत्नागीरी येथील खोल समुद्रात धोक्यात असलेल्या त्या जहाजाच्या जवळ जाऊन पोचले. समुद्राचे पाणी शिरून बुडण्याच्या धोक्यात असलेल्या जहाजावरील त्या १९ सदस्यांनी ‘लाईफराफ्ट’ च्या मदतीने बुडण्याच्या धोक्यात असलेले जहाज सोडल्याचे तटरक्षक दलाच्या जवानांना दिसून आले.
तटरक्षक दलाच्या जवानांनी त्वरित पावले उचलून ‘एमटी पार्थ’ जहाजावरील १९ सदस्यांना आपल्या जहाजात घेऊन त्यांचा जीव सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. बचाव कार्यासाठी गेलेले तटरक्षक दलाचे ते जहाज शनिवारी सकाळी वाचवलेल्या त्या १९ सदस्यांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार अशी माहीती प्राप्त झाली. त्या सर्व सदस्यांचा जीव सुरक्षित असून तटरक्षक दलाचे ते जहाज त्यांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी, इत्यादीसाठी कोस्टल पोलिसांच्या ताब्यात देईल अशी माहीती तटरक्षक दलाच्या सूत्रांनी दिली.