पूजा शर्माला अडकविण्याचे षडयंत्र; आसगाव गुंडगिरी प्रकरणावर वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद
By वासुदेव.पागी | Published: July 6, 2024 04:40 PM2024-07-06T16:40:04+5:302024-07-06T16:41:04+5:30
आसगाव गुंडगिरी प्रकरणात पूजा शर्मा हिचा काहीही संबंध नाही असा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.
वासुदेव पागी, पणजी: आसगाव गुंडगिरी प्रकरणात पूजा शर्मा हिचा काहीही संबंध नाही असा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. या प्रकरणात शर्मा हिला विनाकारण अडकविण्याचे षडयंत्र सरकारकडून सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
पूजा शर्मा हीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी पणजी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान पूजा शर्मा यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी हा दावा केला आहे. पोलीस तपासात प्रमुख संशयित म्हणून ख्वाजा याचा उल्लेख आहे. जेव्हा ख्वाजा हा मुख्य संशयित असूनही त्याला जामीन मिळतो त्यामुळे तर या प्रकरणाशी काही संबंध नसलेल्या तसेच गोव्यापासून दूर असलेल्या पूजा शर्मा हिला कसा काय मिळू शकत नाही, असा त्यांचा दावा आहे. शिवाय ज्या दिवशी ही घटना घडली होती त्यावेळी ही पूजा शर्मा त्या घटनास्थळी नव्हत्या इतकच नव्हे तर त्या गोव्यातही नव्हत्या. त्या मुंबईला होत्या असेही त्यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद करताना सांगितले.
पूजा शर्मा हिच्याकडूना तपास कार्यात सहकार्य न करण्याचा एसआयटीचा दावा हा साफ खोटा असल्याचा दावाही वकिलांनी केला आहे. शर्मा हिने केवळ चौकशीला येण्याची तारीख बदलून मागितली आहे. तपासाला येणार नाही असे म्हटलेले नाही असेही त्यांनी न्यायालयात सांगितले. पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.