एप्रिलपासून वीज दरवाढ; संयुक्त वीज नियामक आयोगाची १५ रोजी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:05 PM2023-02-08T14:05:08+5:302023-02-08T14:05:47+5:30
घरगुती ग्राहकांसाठी अशी आहे दरवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : प्रस्तावित वीज दरवाढीबाबत संयुक्त वीज नियामक आयोग येत्या १५ रोजी सार्वजनिक सुनावणी घेणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी वीज दरात सरासरी ६ टक्के वाढ प्रस्तावित आहे. आयोगाने दरवाढ मान्य केल्यास १ एप्रिलपासून घरगुती वीज ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट १५ ते ६० पैसे अतिरिक्त बाहेर काढावे लागतील. तसेच उच्च दाबाच्या व्यावसायिक वापराच्या विजेचे दरही वाढणार आहेत.
विद्युत विभागाकडून दाखल केलेल्या अनेक याचिकांवर १५ रोजी सार्वजनिक सुनावणी घेतली जाईल. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी दर प्रस्ताव, एकूण महसूल आवश्यकता आदी विषय चर्चेला येतील. सकाळी ११.३० वाजता येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संकुलात मिनी कॉन्फरन्स हॉलमध्ये ही सुनावणी होईल. राज्य सरकारने महसुलातील तफावत भरून काढण्यासाठी वीज दरवाढीची शिफारस केली आहे.
व्यावसायिक कमी दाबाची वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ४५ पैशांवरून ७५ पैसे प्रति किलोवॅट तासाने वापरल्या जाणाऱ्या युनिटनुसार वाढ प्रस्तावित केली आहे. याशिवाय २० किलोवॅटपर्यंत भार (लोड) असलेल्या ग्राहकांसाठी निश्चित ग्राहकांसाठी निश्चित शुल्कात महिना ५ रुपये प्रति किलो वॅट आणि २० किलोवॅटपेक्षा जास्त लोड असलेल्या ग्राहकांसाठी निश्चित शुल्कात महिना १० रुपये प्रति किलोवॅट वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. वीज विभागाने गेल्या ३० नोव्हेंबर रोजी संयुक्त वीज नियमन आयोगासमोर २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी दर प्रस्ताव याचिका दाखल केली होती.
घरगुती ग्राहकांसाठी अशी आहे दरवाढ
उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ७० पैसे प्रति किलोवॅट दरवाढ प्रस्तावित आहे. याशिवाय निश्चित शुल्क २२ रुपये प्रति किलो वॅट प्रतिमहिना वाढवण्याचा प्रस्ताव आहे. उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट ७० पैसे दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"