म्हापशात स्लॅब कोसळून पाच वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
By काशिराम म्हांबरे | Published: June 7, 2024 04:22 PM2024-06-07T16:22:42+5:302024-06-07T16:23:26+5:30
तळीवाडा म्हापसा परिसरातील जुनाट तसेच जीर्ण झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे पार्क केलेल्या दोन कार तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
काशिराम म्हांबरे,म्हापसा : तळीवाडा म्हापसा परिसरातील जुनाट तसेच जीर्ण झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे पार्क केलेल्या दोन कार तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने इमारतीच्या खाली कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, त्याच दरम्यान रस्त्यावरून जाणारा एक व्यक्ती यात किरकोळ जखमी होण्याचा प्रकार घडला आहे. घटना आज दुपारच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती उपलब्ध होताच अग्नी शमन दलाचे जवान तसेच पोलीस तेथे दाखल झाले. दलाच्या जवानांनी इमारतीच्या बाहेरील वाहनावर कोसळलेला स्लॅबचा भाग बाजूला काढला. ही इमारत सुमारे ४५ वर्षा पूर्वीची बरीच जुनी असून ती अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. इमारतीचा वापर होत नसल्याने त्याच्या देखभालीवर दुर्लक्ष करण्यात आले होते. आज म्हापशातील शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने शहरात वाहनांची गर्दी होती. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने लोकांनी मिळेल त्या ठिकाणी आपले वाहने पार्क केली होती. त्यात इथेही वाहने पार्क करण्यात आलेली.
नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार धोकादायक अवस्थेतील या इमारतीतील लोकांना सदर इमारत खाली करण्याची नोटिस पालिकेकडून देण्यात आली होती. तरी सुद्धा तिचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. भविष्यात असे टाळण्यासाठी आपण पालिकेजवळ विनंती करणार असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले.
इमारतीचे मालक मुकूंद कोसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत धोकादायक असल्याने तेथील भाडेकरुंना बाहेर काढून ती खाली करण्याची विनंती २०१८ साली पालिकेला करण्यात आलेली पण पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.