म्हापसा बस स्थानकावर अन्नपदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
By काशिराम म्हांबरे | Published: July 4, 2024 04:47 PM2024-07-04T16:47:14+5:302024-07-04T16:48:49+5:30
मागील आठवडाभरात प्रशासनाच्या वतीने येथील बस स्थानकावर करण्यात आलेली ही तिसरी कारवाई होती.
काशिराम म्हांबरे ,म्हापसा : आंतरराज्य प्रवासी बसेसमधून असुरक्षित वातावरणात होणारी खाद्य पदार्थाची वाहतूक रोखण्याच्या मोहिमे अंतर्गत अन्न आणि औषधे प्रशासनाने म्हापसा येथील कदंब महामंडळाच्या आंतरराज्य बसस्थानकावर छापा मारून अंदाजे २ लाख रुपये किंमतीचे खाद्यपदार्थ जप्त केले.
मागील आठवडाभरात प्रशासनाच्या वतीने येथील बस स्थानकावर करण्यात आलेली ही तिसरी कारवाई होती. आठवडाभराच्या कारवाईत सुमारे ५ लाखाहून जास्त किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
आज गुरुवारी प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, शैलेश शेणवी तसेच इतरांच्या सहकार्याने ही कारवाई केली. आज सकाळपासून प्रशासनाचे अधिकारी बस स्थानकावर पाळत ठेवून होते.
या छाप्यात महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून आलेल्या खासगी बसीतून आणलेला सुमारे ५०० किलोचा पनीर, आईसक्रीमसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच इतर साहित्यही जप्त केले. बसस्थानकावर आलेल्या सर्व अन्न पदार्थांची गुणवत्ता अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली. त्यावर लेबलची सविस्तर माहिती नव्हती. त्यानंतर ते ताब्यात घेण्यात आले. छाप्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या खाद्य पदार्थाची नंतर म्हापसा पालिकेच्या कचरा प्रकल्पात विल्हेवाट लावण्यात आली.