गोवा: 'हे' टुरिझम नव्हे, पर्यटकांची फसवणूक करणारे भामटे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 01:31 PM2024-06-13T13:31:27+5:302024-06-13T13:33:54+5:30

गोवा म्हणजे सेक्स टुरिझमसाठी अनुकूल भूमी, असे जे वातावरण काही घटकांनी तयार केले आहे, ते घातक आहे. 

in goa fraud of cheating tourists are on the rise | गोवा: 'हे' टुरिझम नव्हे, पर्यटकांची फसवणूक करणारे भामटे वाढले

गोवा: 'हे' टुरिझम नव्हे, पर्यटकांची फसवणूक करणारे भामटे वाढले

'लडकी चाहिए क्या?' अशी विचारणा करून पर्यटकांची फसवणूक करणारे भामटे गोव्यात संख्येने वाढत आहेत. आंबटशौकिन तरुण देशी पर्यटकांना मुली पुरविण्याचे खोटे आमिष दाखवून लुबाडले जाते. आर्थिक फसवणूक झाली, तरी पर्यटक पोलिसांकडे धाव घेत नाहीत. तक्रार करीत नाहीत, कारण, आपली नाचक्की होईल, अशी भीती असते. गोव्यातील काही दलाल, काही क्लब-पबवाले आणि गुंडांचे त्यामुळेच फावले आहे. मात्र, अलीकडे एक- दोन पर्यटकांनी पुढे येऊन तक्रारी केल्या. 'मुलगी पुरवू' असे सांगून आपली आर्थिक लुबाडणूक केली गेली, असे पर्यटकाने जाहीरपणे सांगितले. गोवा पोलिस आपल्या पद्धतीने दलालांविरुद्ध कारवाई करीत आहेत. मात्र, प्रकरण मोठे व गंभीर आहे. गोवा म्हणजे सेक्स टुरिझमसाठी अनुकूल भूमी, असे जे वातावरण काही घटकांनी तयार केले आहे, ते घातक आहे. 

गोवा सरकारही या वातावरणाला काही प्रमाणात जबाबदार ठरते. कॅसिनो जुगाराचा नरकासूर गोवा सरकारला नाचवत आहे. सगळीकडे कॅसिनोंच्या जाहिराती. विमानतळावरून पणजीत येताना व शहरात प्रवेश केल्यानंतरही अगदी सगळीकडे कॅसिनोंचेच आकर्षक जाहिरात फलक. पणजीत जुन्या सचिवालय इमारतीच्या परिसरात रस्त्यावर सगळीकडे कॅसिनोंच्याच ग्राहकांची गर्दी. सगळी वाहने, त्याच ग्राहकांची वाहतूक करण्यासाठी त्या मार्गावर धावतात. रात्रीच्या वेळी तर कॅसिनो नगरीचा झगमगाट काही औरच असतो. कॅसिनोंमधून बाहेर येणारा पर्यटक हा दलालांसाठी एक मौल्यवान गिन्हाईक असते. तरुणींचे फोटो मोबाइलवर दाखवले जातात व अमुक हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये तरुणी पुरविण्याचे वचन दिले जाते. तिथूनच फसवणूक सुरू होते.

नेपाळी मुली व महिलांना गोव्यात आणणाऱ्या टोळ्या आता वावरू लागल्या आहेत. 'अर्ज' या संस्थेकडे याबाबतची माहिती आहेच, अन्यायरहित जिंदगी ह्या एनजीओशी कुणीही बोलले तर बरीच माहिती मिळते. गोव्यात छुप्या पद्धतीने होणारा हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय थांबविण्यासाठी 'अर्ज संस्था धडपडत आहे. कधी पोलिसांचे सहकार्य मिळते, तर कधी काही एनजीओंना ते मिळत नाही. गोव्यात केवळ अमलीपदार्थच मिळतात, असे नाही तर नेपाळी महिलादेखील उपलब्ध होतात, असा समज काही व्यावसायिक जगभर पसरवतात. 

गोव्याचे दुर्दैव असे की, ज्या मांडवी नदीच्या किनारी परशुरामाचा शानदार पुतळा आहे, त्याच मांडवी नदीत जुगाराचे अहे सुरू आहेत. ज्या मांडवीकडे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर हे पाहत उभे असल्याचा पुतळा दिमाखात दिसतो आहे, त्याच मांडवी नदीत काळ्या धनाला पूर आलेला आहे. सत्ताधारी विसंगत व परस्परविरोधी वागत असतात. त्यांची निवडणुकीवेळची भाषा वेगळी असते व एरव्ही कृती वेगळी असते. अर्थात येथे विषयांतर होण्याची शक्यता असल्याने तूर्त एवढेच पुरे आहे. गोवा ही परशुरामभूमी, देवभूमी आहे, अशा प्रकारच्या घोषणा ऐकायला छान वाटतात. मात्र, गोवा खरेच देवभूमी आहे, असे दाखवून देण्यासाठी सरकारला अगोदर जास्त प्रामाणिक व्हावे लागेल, ड्रामाबाजी नको. पोर्तुगिजांच्या सर्व खुणा पुसून टाकू, असे सांगणाऱ्या सरकारने लक्षात घ्यावे की, निदान कॅसिनोंचे अड्डे तरी गोव्यात पोर्तुगिजांनी आणले नव्हते. त्या खुणा अगोदर पुसणे योग्य ठरणार नाही काय?

कालच इंग्रजी दैनिकांमध्ये नेपाळी महिलांच्या पुरवठ्याविषयीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. गोव्यात रोजगार संधी देतो, असे सांगून काहीजणांनी नेपाळी महिलांना गोव्यात आणले व शरीर विक्रीच्या कामाला लावले. गेल्या दहा वर्षांत सरकारी यंत्रणेने सेक्स धंद्यातून गोव्यात २९ नेपाळी महिलांची सुटका केली, असे त्या बातमीत म्हटले आहे. ग्रामीण नेपाळी महिला गोव्यात आणून धंदा केला जातो, याबाबत 'अर्ज' संस्थेने एका बैठकीत धोक्याचा इशारा दिला आहे. काठमांडूहून कधी बोगस कागदपत्रांच्या आधारे, तर कधी चोरट्या मार्गाने महिलांना आणले जाते.

पश्चिम बंगाल, बांगलादेशमधूनही मुली, महिला गोव्यात आणल्या जात असल्याची प्रकरणे पूर्वी उजेडात आलेली आहेत. गोवा म्हणजे थायलंड व बैंकॉक नव्हे आणि कळंगूट-कांदोळीचा भाग म्हणजे पटाया नव्हे, एकदा एका आमदाराचेही वाहन काहीजणांनी थांबवून 'लड़की जाहिए क्या?' अशी विचारणा केली होती. वीरेश बोरकर यांनी विधानसभेत याबाबतचा किस्सा सांगितला होता. शरीरविक्रीचा धंदा करणाऱ्या रॅकेटचे कंबरडे पोलिसांना मोडावे लागेल.

 

Web Title: in goa fraud of cheating tourists are on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.