गोव्यात ग्रामसभा तापल्या, सावई वेरेंत जलस्रोत अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय
By किशोर कुबल | Published: October 29, 2023 03:16 PM2023-10-29T15:16:22+5:302023-10-29T15:17:59+5:30
बोरी पुलासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच ३,९३,१८४ चौ. मी. भूसंपादनाची अधिसूचना जारी केली आहे.
पणजी : गोव्यात विविध पंचायतींच्या ग्रामसभा वेगवेगळ्या प्रश्नांवरून वादळी ठरल्या. सावई वेरें ग्रामसभेत शितोळें तळ्याच्या विषयावरून आक्रमक होत ग्रामस्थांनी जलस्रोत अधिकाऱ्यांना काढता पाय घेणे भाग पाडले. लोटली ग्रामसभेत नवीन बोरी पुलाला संतप्त रहिवाशांनी विरोध केला.
शितोळें तळ्याच्या ठिकाणी येऊ घातलेल्या प्रकल्पाबद्दल माहिती देण्यासाठी जलस्रोत खात्याचे अधिकारी ग्रामसभेला आले होते. त्यांना विविध प्रश्न विचारून ग्रामस्थांनी फैलावर घेतले तसेच सरपंचांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दुसरीकडे बोरी पुलासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच ३,९३,१८४ चौ. मी. भूसंपादनाची अधिसूचना जारी केली आहे. बोरी ते लोटलीपर्यंत ५.७३ किलोमीटरचा बगल मार्गही येणार आहे. या प्रकल्पाला लोटली ग्रामसभेत रहिवाशांनी विरोध केला. नवीन पूल नकोच, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
कारापूर, सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेत पाच पंच सदस्य फिरकलेच नाहीत. ग्रामस्थांचीही अगदी अल्प उपस्थिती होती. तासभरच चाललेल्या ग्रामसभेत कचरा, मोकाट गुरे, भटके कुत्रे आदी किरकोळ विषय चर्चेला आले.
'पेडणे राखीव नको'
दरम्यान धारगळ ग्रामपंचायत ग्रामसभेत गेली ४५ वर्षे पेडणे मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत पुढील विधानसभा निवडणुकीत ही राखीवता काढून टाकावी, असा ठराव घेण्यात आला.
रिवण ग्रामसभेत आयआयटी प्रकल्पाला हिरवा कंदील
दरम्यान, रिवण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आयआयटी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवणारा ठराव घेण्यात आला. या ठिकाणी दहा लाख चौरस मीटर जमिनीत आयआयटी प्रकल्प प्रस्तावित आहे. स्थानिक आमदार तथा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आयआयटी प्रकल्पासाठी आग्रही आहेत. हा विषय ग्रामसभेत उपस्थित झाला असता ग्रामस्थांनी प्रकल्पाला समर्थन दिले व त्याचबरोबर या आयआयटी प्रकल्पाला 'ऋषीवन' असे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली.