चक्क गुगल मॅपवर लिहिले ‘हांगा पोलिस आसता’, सोशल मीडियावर चर्चांणा उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 05:44 PM2024-04-22T17:44:59+5:302024-04-22T17:46:20+5:30
वाहतूक पोलिस महामार्ग, किनारी भागातील चौकांसह विविध ठिकाणी दररोज थांबून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क,पणजी : वाहतूक पोलिस महामार्ग, किनारी भागातील चौकांसह विविध ठिकाणी दररोज थांबून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करतात. हेल्मेट, परवान्यासह विविध कारणांनी कारवाई केली जाते. अनेकवेळा लोकांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागते. अशातच आता अज्ञातांनी आता चक्क गुगल मॅपवर ज्या जागेवर पोलिस नेहमी कारवाई करण्यासाठी थांबलेले असतात, अशा ठिकाणी कोंकणी भाषेत ‘हांगा पोलिस आसता’ (येथे पोलिस असतात) अशी स्थाननिश्चितीत करत इतरांना सावध केले आहे.
गुगल मॅपवर अस्नोडा पार (मुळगाव) आणि कुंडई-मडकई सर्कल अशा दोन ठिकाणी पोलिस असतात याची माहिती देण्यात आली आहे. म्हापसा शहरातही जे रस्ते एकेरी मार्ग आहेत आणि लोकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते अशा ठिकाणी कारवाई केली जाते. ही ठिकाणे मॅपवर दर्शविण्यात आली आहेत.
दक्षिण गोव्यात कुंडई - मडकई मार्गावरील चौकाच्या पुढे, काही अंतरावर नेहमी वाहतूक पोलिस उभे असतात. नियम डावलून जाणाऱ्या वाहनधारकांना ‘तालांव’ दिला जातो. तर उत्तर गोव्यात मुळगाव सरकारी हायस्कूलकडून पुढे कासारपाल - दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरही पोलिस कारवाई करत असतात. हा रस्ता एकेरी आहे याची माहिती नसणारे अनेकजण फसतात आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागते. या ठिकाणाचाही उल्लेख मॅपवर ‘हांगा पोलिस आसता’ असा करण्यात आला आहे.
पोलिसांकडून दररोज ठराविक ठिकाणी थांबून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, वाहन परवाना, ट्रीपल सीट वाहन चालवणे, पीयूसी, इन्शुरन्स अशा विविध कागदपत्रांची तपासणी करून वाहनधारकांना दंड ठोठावला जातो. त्यावर उपाय शोधत अज्ञातांनी चक्क गुगल मॅपवर अशी ठिकाणे दाखवत इतरांना सावध करण्याचा मार्ग शोधला आहे. याशिवाय ज्या ठिकाणी स्पीड कॅमेरे आहेत, अशी ठिकाणेही दाखविण्यात आली आहेत. सोशल मीडियावर या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.