... तर वाचला असता माय लेकाचा जीव; मंडूर येथील घटनेनं परिसरात हळहळ
By पूजा प्रभूगावकर | Published: July 9, 2024 04:49 PM2024-07-09T16:49:49+5:302024-07-09T16:50:28+5:30
घराची भिंत कोसळून माय लेकाचा मृत्यू.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: मंडूर येथील रॉड्रिग्स कुटुंबाच्या घराची भिंत मागील वर्षीही पावसाळ्यात कोसळली होती. मात्र आपत्कालीन व्यवस्थापना अंतर्गत त्यांना वेळेत नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. रक्कम मिळाली असती तर कदाचित अनुचित घटना टाळता आली असती.
राज्यात सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी सांतआंद्रे मतदारसंघातील मंडूर येथील रॉड्रिग्स कुटुंबाच्या घराची भिंत कोसळली. त्यावेळी आई मारीया रॉड्रिग्स व मुलगा आल्फ्रेंड रॉड्रिग्स हे घरातच होते. या घटनेत ते जागीच ठार झाले. या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले, की रॉड्रिग्स कुटुंबियांच्या घराची एक भिंत मागील वर्षीही पावसाळ्यात कोसळली होती. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापना कडे यासंदर्भात अहवाल पाठवला होता. आपत्कालीन व्यवस्थापना अंतर्गत सरकारने निधीची तरतूद केली असून पावसाळ्यात नुकसान झाल्यास नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत केली जाते. रॉड्रिग्स कुटुंबाला सुध्दा ही मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र वर्ष उलटले तरी त्यांना ही आर्थिक मदत मिळाली नव्हती असे त्यांनी सांगितले.