४१ वर्षानंतर बेपत्ता बापाचा लागला शोध; कुटुंबालाही बसला आश्चर्याचा धक्का

By पंकज शेट्ये | Published: January 9, 2024 05:19 PM2024-01-09T17:19:11+5:302024-01-09T17:20:19+5:30

चित्रपट - नाटकात पाहीलेल्या काही काल्पनिक गोष्टी खऱ्याने घडू शकतात अशा प्रकारची प्रचिती बायणा, वास्को येथे राहणाऱ्या अनेकांना मंगळवारी झाली.

In goa Missing father found after 41 years; The family was also shocked | ४१ वर्षानंतर बेपत्ता बापाचा लागला शोध; कुटुंबालाही बसला आश्चर्याचा धक्का

४१ वर्षानंतर बेपत्ता बापाचा लागला शोध; कुटुंबालाही बसला आश्चर्याचा धक्का

वास्को: ४१ वर्षानंतर गुजरात येथील अमीरभाई सांग्रीया ह्या ८१ वर्षीय वृद्ध इसमाला पुन्हा एकदा त्यांच्या कुटूंबियांना भेटण्याची संधी मिळाली. ४१ वर्षापूर्वी अमीरभाई गोव्यात पोचल्यानंतर काही मानसिक कारणामुळे ते घरचा पत्ता विसरले होते. घरचा पत्ता विसरलेल्या अमीरभाई यांची ४१ वर्षापासून बायणा, वास्को येथील एका मुस्लीम कुटूंबाने काळजी घेतली. अमीरभाई नामक वृद्धाच्या कुटुंबाची माहिती बायणा येथील त्या कुटूंबाला स्थायिक डॉक्टर मेहुल शुक्ला याच्या मदतीने मिळाल्यानंतर अमीरभाईच्या कुटुंबाशी संपर्क करण्यात आला.

सोमवारी रात्री अमीरभाई याचा मोठा मुलगा युसुफ आणि छोटा मुलगा गनी विमानातून गोव्यात पोहचल्यानंतर मंगळवारी (दि.९) ते बेपत्ता असलेल्या त्यांच्या ८१ वर्षाय वडीलांना भेटले असून लवकरच ते त्यांच्या वडीलांना घेऊन गुजरात येथील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील जांबू येथे असलेल्या त्यांच्या घरी घेऊन जाणार असल्याची माहीती मिळाली.

अनेक चित्रपट, धारावायिक, नाटकात एक माणूस बेपत्ता झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर तो आपल्या कुटूंबाला जाऊन भेटतो अशा प्रकारच्या गोष्टी पाहील्या असाव्यात. मात्र चित्रपट - नाटकात पाहीलेल्या काही काल्पनिक गोष्टी खऱ्याने घडू शकतात अशा प्रकारची प्रचिती बायणा, वास्को येथे राहणाऱ्या अनेकांना मंगळवारी झाली. ४१ वर्षापूर्वी बेपत्ता झालेले आपले वडील अमीरभाई बायणा, वास्को येथे असल्याचे त्यांच्या मुलांना कळताच सोमवारी रात्री मोठा मुलगा युसुफ आणि छोटा मुलगा गनी विमानाने गोव्यात पोचले. मंगळवारी सकाळी बायणा येथील डॉ. मेहूल शुक्ला यांच्या चिकीत्सालयासमोर युसूफ आणि गनी यांची ४१ वर्षानंतर त्यांच्या वडीलांशी भेट झाल्यानंतर दोन्ही मुलांना त्यांचे अश्रु आवरता आले नाही.

४१ वर्षानंतर वडील मुलांची झालेली ती भेट उपस्थितांनी पाहील्यानंतर लोकही भाऊक झाले. युसूफ आणि गनी यांनी ४१ वर्षानंतर भेटलेल्या त्यांच्या वडीलाशी घरी तुमची पत्नी आणि कुटूंबातील इतर सदस्य वाट पाहत असल्याचे सांगितल्यानंतर ते सुद्धा भाऊक झाले. अमीरभाई सांग्रीया यांचे घर गुजरात येथील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील जांबू गावात असल्याची माहीती डॉ. मेहूल शुक्ला यांनी त्यांना संपर्क केला असता दिली. ४१ वर्षापूर्वी काम करण्यासाठी म्हणून अमीरभाई मुंबईत आले होते. तेथे ते आजारी पडल्याने त्यांनी मुंबई सोडून गोव्यात येण्यास पसंत केले. गोव्यात पोचल्यानंतर त्यांनी वास्कोत येऊन काही वर्षे एका हॉटेलात काम केले. कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर पडल्यानंतर गोव्यात पोचलेल्या अमीरभाई यांना काही मानसिक कारणामुळे घराचा पत्ता आठवेना झाला.

अमीरभाई यांना ४ मुलगे आणि २ मुली असल्याची माहीती डॉ. शुक्ला यांनी दिली. घरातून जेव्हा अमीरभाई निघाले होते त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा युसूफ सुमारे १५ वर्षाचा होता. अमीरभाई यांची गोव्यात बायणा, वास्को येथे असलेले एक मुस्लीम कुटूंब काळजी घ्यायची. अमीरभाई त्या कुटूंबातील एक सदस्यच बनला होता अशी माहीती डॉ. शुक्ला यांनी दिली. बायणा येथे ज्या कुटूंबाबरोबर अमीरभाई रहायचे त्यांना मी ७ वर्षापासून ओळखत असल्याचे डॉ. शुक्ला यांनी सांगितले. त्या कुटूंबातील सदस्य आणि अमीरभाईसुद्धा अनेकवेळा माझ्याशी तपासणीला यायचे. अमीरभाई काही दिवसापूर्वी आजारी झाल्यानंतर त्याने मुलांचे आणि गावाचे नाव घेण्यास सुरवात केल्यानंतर बायणा येथे राहणाऱ्या त्या कुटूंबाने अमीरभाईच्या घरचा पत्ता शोधण्याच्या प्रयत्नाला सुरवात केली.

त्या कुटूंबाला मी मूळ गुजरातचा असल्याचे माहीत असल्याने सोमवारी (दि.८) त्यांनी मला अमीरभाईच्या कुटूंबाचा शोध लावण्यासाठी मदत करण्याकरीता विनंती केली. मी त्वरित गुजरात येथील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील डॉ. चेतन पटेल यांना संपर्क करून अमीरभाईबद्दल माहीती देऊन त्याच्या कुटूंबाला शोधण्याकरीता मदत मागितली. त्याने मला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दीड तासाने डॉ. चेतनने मला संपर्क करून ५६ वर्षीय युसूफ नामक इसमाचा गुजरात मधील जांबू गावातून वडील ४१ वर्षापूर्वी बेपत्ता झाल्याची माहीती दिली. युसूफ तुम्हाला लवकरच संपर्क करणार असल्याचे डॉ. चेतन यांनी मला कळविले. काही मिनिटानंतर युसूफने मला संपर्क केला. त्याच्याशी मी चर्चा केल्यानंतर अमीरभाई युसूफ यांचेच वडील असल्याचे निश्चित झाले.

युसूफ यांनी लगेच आम्ही गोव्यात येत असल्याचे सांगून सोमवारी रात्रीच युसूफ आणि त्याचा दुसरा भाऊ गनी गोव्यात येऊन पोचले. मंगळवारी ४१ वर्षापासून बेपत्ता असलेल्या आपल्या वडीलांना पाहताच युसूफ आणि गनी यांना आनंदाचे अश्रु आवरता आले नाहीत असे डॉ. शुक्ला यांनी सांगितले. घरी तुमची पत्नी आणि तुमचे इतर दोन मुलगे आणि मुली वाट पाहत असल्याचे युसूफ यांनी वडीलांना भेटल्यानंतर सांगितले. ४१ वर्षानंतर अमीरभाई लवकरच गुजरात येथील आपल्या घरी परतणार आहेत. अमीरभाईची ही सत्य घटना लोकांच्या कानावर पडल्यानंतर... देवाने कोणाच्या नशीबी काय लिहले आहे ते देवच जाणे असे अनेकांनी मनोमनी नक्कीच म्हटले असावे.

Web Title: In goa Missing father found after 41 years; The family was also shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.