राज्यात मान्सूनपूर्व सरींमुळे गोवेकर सुखावले; लवकरच पाऊस दाखल होणार
By वासुदेव.पागी | Published: June 1, 2023 03:50 PM2023-06-01T15:50:55+5:302023-06-01T15:51:09+5:30
आटत चाललेली गोव्यातील धरणे आणि अनेक ठिकाणच्या सुकलेल्या विहिरी यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यातच मान्सून लांबणीवर पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे चिंता आणखी वाढली होती
पणजी : मान्सूनपूर्व सरींच्या आगमनामुळे धगधगत्या ग्रीष्माच्या दाहातून गोमंतकियांना दिलासा मिळाला आहे. मान्सूनही लवकरच दाखल होण्याच्या शक्यतेमुळे निर्माण झाली आहे. श्रीलंकेजवळ भारतीय महासागरात दाखल झालेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तो अरबी समुद्रातून वळसा घेऊन वेगाने केरळ किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज सार्थ ठरण्याचे पूर्ण संकेत असून विलंब झाला तरी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून केरळ किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मान्सूनच्या आगमनाची पूर्व सूचना देणाऱ्या पूर्व मान्सूनच्या सरी गोव्यापर्यंत पोहोचल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनेही याची पुष्टी केली आहे.
आटत चाललेली गोव्यातील धरणे आणि अनेक ठिकाणच्या सुकलेल्या विहिरी यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यातच मान्सून लांबणीवर पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे चिंता आणखी वाढली होती; परंतु मान्सूनपूर्व सरी दाखल झाल्यामुळे आता मान्सूनही फार लांब नाही हा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाल्यास ८ ते ९ जूनपर्यंत तो गोव्यातही दाखल होण्याची पूर्ण शक्यता आहे.
गुरुवार उजाडलाच तो मुळांत पावसाच्या ढगांनी झाकलेले आकाश घेऊन. दरम्यान मडगावात जोरदार पाऊस पडला. सासस्टीत इतर ठिकाणीही पाऊस पडला. आजोशी, मुंडूर आणि करमळी या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तिसवाडी आणि बार्देश तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर पावसाची रिमझिम होण्याची शक्यताही हवामान खाते वर्तवीत आहे.