मंत्रीपदाची मागणी करत सावर्डे मतदार संघातील सरपंच पोहोचले मुख्यमंत्र्यांकडे
By आप्पा बुवा | Published: June 17, 2024 05:12 PM2024-06-17T17:12:26+5:302024-06-17T17:16:04+5:30
साखळी येथील मंदिर रवींद्र भावनात सोमवारी सहाही पंचायतीचे सरपंच, काही उपसरपंच व मोठ्या संख्येने पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.
अप्पा बुवा,फोंडा: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावर्डे मतदार संघातून दक्षिण गोव्यातील सर्वाधिक मताधिक्य दिल्याबद्दल पोच पावती म्हणून सावर्डे मतदार संघाचे आमदार गणेश गावकर यांना मंत्रिपद देण्याची मागणी मतदार संघातील सरपंचांनी केली आहे. साखळी येथील मंदिर रवींद्र भावनात सोमवारी सहाही पंचायतीचे सरपंच, काही उपसरपंच व मोठ्या संख्येने पंच सदस्य यावेळी उपस्थित होते. सावर्डे भाजप मंडळातील काही प्रमुख पदाधिकारी सुद्धा सरपंच यांच्या बरोबर ही मागणी घेऊन गेले होते.
लोकसभा निवडणुकी वेळी आमदार गणेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी कसे काम केले याची माहिती यावेळी सावर्डे मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. मागची अनेक वर्षे सावर्डे मतदार संघ भाजपच्या मागे खंबीरपणे उभा राहत आहे असे असतानाही इथे मंत्रीपदाच्या बाबतीत मेहरनजर होत नाही असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.विनय तेंडुलकर नंतर या मतदारसंघाला भाजपच्या मुशीत तयार झालेला मंत्री मिळालेला नाही. काही वर्षे दीपक पावसकर हे मंत्री होते परंतु ते मगो मधून नंतर भाजपमध्ये आले होते. हे सर्व मुद्दे सरपंचाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना पटवून दिले.
त्यांचे सर्व निवेदन ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली. आमदार गणेश गावकर यांना भविष्यात नक्की मंत्रीपद मिळेल असा सकारात्मक प्रतिसाद सुद्धा त्यांनी शिष्टमंडळाला दिला.