कला अकादमी बनली भ्रष्टाचाराचे स्मारक; युरी आलेमाव यांचे विधान
By पूजा प्रभूगावकर | Published: July 10, 2024 05:07 PM2024-07-10T17:07:44+5:302024-07-10T17:09:16+5:30
कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हे अत्यंत दर्जाहीन असून अकादमी ही भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हे अत्यंत दर्जाहीन असून अकादमी ही भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे. सरकारने या सर्व प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. यासंबंधीत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
कला अकादमीची आपण पाहणी केली. अकादमीच्या कामात काही त्रुटी आढळून आल्या. एकूणच कलाकारांची गरज समजून कला अकादमीचे नुतनीकरण झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कलाकारांना या वास्तुच्या नुतनीकरणावेळी विश्वासात घेतले नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली.
आलेमाव म्हणाले, की कला अकादमीचे नुतनीकरण झाल्यानंतर नाटक, तियात्र आणखीन चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर सादर करता येईल असे कलाकारांना वाटले होते. प्रत्यक्षात मात्र नाटक व तियात्र सादर करताना कलाकारांनाच माईक आणावा लागत आहे. मग या नुतनीकरणाचा नक्की काय फायदा झाला? साऊंड सिस्टम, माईक, लाईट्सचा दर्जा खालावला आहे. प्रयोग सादर होत असताना प्रेक्षकांना धड ऐकताना देखील अडचण येत असल्याची टीका त्यांनी केली.