करासवाडा येथे म्हापसा पोलिसांची भाडेकरुंची तपास मोहीम, ४० जणांना अटक
By काशिराम म्हांबरे | Published: May 30, 2024 03:21 PM2024-05-30T15:21:18+5:302024-05-30T15:21:38+5:30
रितसर नोंदणी न करता भाड्याने राहणाऱ्या सुमारे ४० भाडेकरूंवर म्हापसा पोलिसांकडून कारवाई करून त्यांना अटक केली आहे.
रितसर नोंदणी न करता भाड्याने राहणाऱ्या सुमारे ४० भाडेकरूंवर म्हापसा पोलिसांकडून कारवाई करून त्यांना अटक केली आहे. राज्यात घडत असलेल्या विविध गुन्हेगारी प्रकरणात स्थलांतरीत लोक तसेच कामगार वर्गाचा हात असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई म्हापसा पोलीस स्थानकाचे हंगामी निरीक्षक प्रशल देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.
गेल्या आठवड्यात थिवी येथील प्रसिद्ध अशा लाला की बस्तीत कोलवाळ पोलिसांकडून कारवाई करून ९६ जणांना अटक करण्यात आली होती.
निरीक्षक देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या सर्व ४० भाडेकरुं विरोधात सीआरपीसीच्या कलम ४१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान भाडेकरुंच्या मालकांनी त्यांची रितसर नोंदणी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आल होते. तसेच काही भाडेकरूंजवळ योग्य कागदपत्रे नसल्याचेही आढळून आले. या मोहिमे दरम्यान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिक्षक अक्षत कौशल तसेच उपअधिक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.