म्हापशातील राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हरचे मंगळवारी उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 06:12 PM2018-09-10T18:12:33+5:302018-09-10T18:12:38+5:30
म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्ग १७ वर असलेला फ्लाय ओव्हरचा लोकार्पण सोहळा चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी, दि. ११ रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
म्हापसा - म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्ग १७ वर असलेला फ्लाय ओव्हरचा लोकार्पण सोहळा चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी, दि. ११ रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उत्तर गोव्यातील वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा दुवा असून या प्रकल्पामुळे राज्यात येणाºया पर्यटकां बरोबर वाहन चालकांना त्याचा बराच फायदा होणार आहे.
केंद्र सरकारात संरक्षण मंत्री असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सहा मार्गी फ्लाय ओव्हरची पायाभरणी केली होती. राष्ट्रीय महामार्गावर वाढती वाहतूक तसेच वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर या फ्लाय ओव्हरची नित्तांत गरज होती. त्यामुळे सरकारकडून त्याचे काम हाती घेण्यात आले होते.
सदर फ्लाय ओव्हरवर सुमारे अंदाजीत २९.४२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्याची पायाभरणी २ फेब्रुवारी २०१६ रोजी करण्यात आली होती. काम पूर्ण करण्यासाठी ४५० दिवसांची मुदत देण्यात आाली होती. त्यामुळे तो पूल १० मे २०१७ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होता. पण पर्वरीला राजधानी पणजीशी जोडणाºया मांडवी पुलावर सुरु असलेल्या तिसºया पुलाच्या कामामुळे या फ्लाय ओव्हरचे काम रखडले होते. त्यामुळे तब्बल पाचवेळा त्याला मुदत वाढही देण्यात आली होती.
निर्धारीत वेळेत पूल पूर्ण होऊ न शकल्याने बरीच टिकाही करण्यात आली होती. फ्लाय ओव्हरला लागून असलेला बगल रस्ता पावसामुळे खराब झाल्याने या महामार्गावर वाहतूकीचा बराच खोळंबा होत होता. खड्ड्यामुळे वाहने अडकून पडल होती. त्यातून वाहने चालवणे त्रासदायी ठरले होते. फ्लाय ओव्हर खालून हळदोणा मतदारसंघाला जोडणारा रस्ता बनवण्यात आला असून त्याचे अंतिम टप्प्यातील काम सध्या सुरु आहे.
हळदोणचे आमदार ग्लेन टिकलो यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही किरकोळ काम वगळता सर्व काम पूर्ण करण्यात आल्याचे ते म्हणाले. सदर प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्याचे अपेक्षीत होते; पण त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ढवळीकर करणार आहेत. उद्घाटन करण्यात येणारा हा फ्लाय ओव्हर नोव्हेंबर महिन्यात तात्पुरत्या डागडूजीसाठी बंद करण्याची शक्यता आहे.