गोव्यात चौथ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:16 PM2019-01-16T20:16:57+5:302019-01-16T20:17:04+5:30
चौथ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी दिल्लीतील विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पराशर यांच्या हस्ते झाले येथे झाले. चार दिवस हा महोत्सव चालणार असून वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थाचे दुर्मिळ प्रदर्शनही या ठिकाणी भरविण्यात आले आहे.
पणजी : चौथ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी दिल्लीतील विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पराशर यांच्या हस्ते झाले येथे झाले. चार दिवस हा महोत्सव चालणार असून वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थाचे दुर्मिळ प्रदर्शनही या ठिकाणी भरविण्यात आले आहे.
येथील आयनॉक्स आणि माकिनिझ पॅलेसमध्ये हा चित्रपट महोत्सव भरवण्यात आला आहे. ‘परमाणू’ हा उद्घाटनाचा चित्रपट होता. विज्ञानाधारित प्रदर्शन तसेच टेलेस्कोप बनविण्याच्या कार्यशाळेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. विज्ञानावर आधारित ९ फिचर फिल्म व ३0 लघुपट तसेच माहितीपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येतील. देशभरातील ६0 वैज्ञानिक तसेच संशोधक यात सहभागी होतील. ‘फ्युचर ऑफ दि ओशियन’, ‘टेक्नॉलॉजी अॅण्ड इनोव्हेशन’ आणि ‘बेसिक सायन्सेस’ या तीन संकल्पनांवर यंदाचा हा विज्ञान चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. विज्ञान शिक्षक तसेच टेलेस्कोप कार्यशाळा आणि प्रदर्शनाचाही यात समावेश आहे.
या प्रसंगी बोलताना पराशर म्हणाले की, ‘या महोत्सवाला प्रतिसाद पाहता पुढील काळात यापेक्षाही मोठा महोत्सव आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स, एनआयओचे संचालक डॉ. सुनिलकुमार सिंह, शेखर सरदेसाई, जयंतराव सहस्रबुध्दे, प्रा. सुहास गोडसे, अभय भामईकर हे यावेळी उपस्थित होते.
गोव्यात हा विज्ञान चित्रपट महोत्सव झपाट्याने पुढे जात असल्याचे जिल्हाधिकारी मार्टिन्स म्हणाले. डॉ. सुनिलकुमार सिंह म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांनाही विज्ञान समजले पाहिजे. त्यासाठी ते सोपे करुन सांगायला हवे.’
१२८ शैक्षणिक संस्थांनी या महोत्सवात भाग घेतला आहे त्यात १२५ गोव्यातील आणि ३ महाराष्ट्रातील आहेत. विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, परिसंवाद, चित्रपट प्रदर्शन आदी गोष्टी होतील. आघाडीचे शास्रज्ञ डॉ, शेखर मांडे, प्रा. शर्मिष्ठा बॅनर्जी, डॉ. अरविंद रानडे, डॉ, सुमित मिश्रा आदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
एनआयओ, भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्र, गोवा राज्य इनोवेशन कौन्सिल, विक्रम साराभाई स्पेस एक्झीबिशन, कैगा अणु ऊर्जा केंद्र, नॅशनल सेंटर फॉर पोलर अॅण्ड ओशन रीसर्च या संस्थांनी प्रदर्शनात भाग घेतला आहे.
१८ रोजी विज्ञान शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतली जाईल. १९ रोजी समारोप सोहळ्याला पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम् हे प्रमुख पाहुणे असतील. ‘भारतीय अणु कार्यक्रम-विकसनशील जगासाठी आदर्श’ या विषयावर ते व्याख्यान देतील.