महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी; मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते नारीशक्ती ॲपचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:34 AM2023-03-28T08:34:35+5:302023-03-28T08:35:22+5:30
रवींद्र भवन साखळी येथे आयोजित नारीशक्तीचा गौरव कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी अॅपचे लोकार्पण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: महिला सशक्तीकरण तसेच सर्वच क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध व्हावी, तसेच उपलब्ध साधनांचा सुयोग्य उपयोग करून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, या हेतूने नारीशक्ती अॅप तयार केले आहे. महिलांच्या उत्कर्षासाठी चांगले साधन म्हणून त्याचा उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
रवींद्र भवन साखळी येथे आयोजित नारीशक्तीचा गौरव कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी अॅपचे लोकार्पण करताना नारीशक्तीमध्ये आपले जीवन तसेच इतरांचे जीवन समृद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. शिक्षण, कला, सामाजिक बांधिलकी व सामाजिक स्वास्थ्य अशा चौफेर क्षेत्रातील जीवन प्रवासात महिलांना पूर्ण सहकार्य मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी हा उपक्रम महिलांना एकत्र आणून त्यांच्या उपजत प्रतिभेला चालना देणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
यावेळी शुभदा सावईकर, रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर, विठोबा घाडी व इतर मान्यवर उपस्थित होते. गोवा राज्य स्वयंसहाय संघटनेच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनी नारीशक्ती अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करता येत आहे. याद्वारे नारीशक्तीला समान अधिकार बहाल करणे, तसेच जगातील सर्व क्षेत्रात त्यांच्यासाठी समान संधी उपलब्ध करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.
समाजातील उपेक्षित महिला तसेच सर्वच महिला घटकांच्या प्रतिभेला जागतिक पातळीवर उंच भरारी घेता यावी, यासाठी आमचे संघटित प्रयत्न असतील. आधुनिक युगात नवे बदल, नव्या संधी व उज्ज्वल भवितव्य उपलब्ध करून नवी पिढी अधिक सक्षम करणे, हा आमचा उद्देश असल्याचे सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"