गोव्यामध्ये शिवगोमंतगाथा रथयात्रेचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 03:22 PM2017-11-18T15:22:20+5:302017-11-18T15:22:39+5:30
लहान वयातच शिवाजी महाराजांनी सैन्य उभे केले. त्यांना रामदास स्वामीं गुरू लाभले. गनिमी कावा युद्धनीतीचा वापर करून त्यांनी अनेक किल्ले काबिज केले. गोमंतकातील कोलवाळसारख्या भागाला शिवाजी महाराजांचे पाय लागले.
म्हापसा : लहान वयातच शिवाजी महाराजांनी सैन्य उभे केले. त्यांना रामदास स्वामीं गुरू लाभले. गनिमी कावा युद्धनीतीचा वापर करून त्यांनी अनेक किल्ले काबिज केले. गोमंतकातील कोलवाळसारख्या भागाला शिवाजी महाराजांचे पाय लागले. म्हणूनच शिवगोमंतगाथा रथयात्रेचा कोलवाळ मधून प्रारंभ करण्यात येत आहे. ही आनंतवार्ता असल्याचे माजी पर्यटनमंत्री तथा थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी उद्गार काढले.
गोमंतक मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोमंतकातील आगमनाच्या 350व्या वर्षानिमित्त गोमंतशिवगाथा या शिवचरित्र संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी सकाळी १० वाजता कोलवाळ श्रीराम मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलीत करून आमदार हळर्णकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या व्यासपीठावर माजी सभापती तथा या संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आर्लेकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, कोलवाळ पंचायतचे सरपंच दशरथ बिचोलकर, उपसरपंच रितेश वारखंडकर, पंचसदस्य बाबनी साळगावकर, देवस्थानचे व्यवस्थापक महाबळेश्वर चोडणकर उपस्थित होते.
स्वागतपर भाषणात राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले की, १९ नोव्हेंबर १९६७ मध्ये पोर्तुगीजांच्या हातून शिवाजी महाराजांनी कोलवाळमधील किल्ला काबीज केला. या ठिकाणी ते दोन दिवस वास्तव्य करून राहिले. तर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेल्या कोलवाळ येथील किल्ल्याचे जतन करावे असे आवाहन सरकारला करून त्यांनी दोन दिवसात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. यावेळी सरपंच दशरथ बिचोलकर, उपसरपंच रितेश वारखंडकर यांनी आपली मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार तुषार टोपले यांनी मानले. त्यानंतर शिवगोमंतगाथा रथाची मिरवणूक काढण्यात आली. ती कोलवाळ किल्ल्याकडून अस्रोडा, डिचोलीहून साखळीकडे प्रयाण केले.