कर्नाटक बंदमुळे गोव्यातील प्रवाशांची गैरसोय, वाहनांवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 12:12 PM2018-01-25T12:12:50+5:302018-01-25T12:13:13+5:30
म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या गुरुवारी कर्नाटकमध्ये धावल्या नाहीत.
पणजी : म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या गुरुवारी कर्नाटकमध्ये धावल्या नाहीत. गोव्याहून बेळगाव, हुबळी, धारवाड आदी भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गोव्याच्या काही खासगी वाहनांवर कर्नाटकमध्ये दगडफेक झाली आहे.
कदंब वाहतूक महामंडळाने बुधवारपासूनच कर्नाटकमधील आपली प्रवासी बससेवा थांबवली आहे. फक्त बुधवारी रात्री गोव्याहून बंगळुर व म्हैसुरला कदंबच्या दोन बसगाड्या सोडण्यात आल्या. त्या आज पहाटे तिथे दाखल झाल्या. गोव्याहून कदंबच्या अन्य बसगाडय़ा गेल्या नाहीत. गोव्याहून जी खासगी वाहने कर्नाटकमध्ये जात होती, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली. अनेक गोमंतकीयांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये आपली खासगी वाहने न नेणेच पसंत केले. हजारो प्रवासी कदंब बस स्थानके व अन्यत्र अडकून पडले. अलिकडे म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटककडून वारंवार बंद पुकारला जात असल्याने गोव्यात चिड व्यक्त होत आहे. खरे म्हणजे गोमंतकीयांनीच बंद पुकारायला हवा, कारण गोव्यात येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवू पाहत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया गोव्याच्या एका मंत्र्यानेही व्यक्त केली आहे.
म्हादई पाणी प्रश्नावरून गोवा व कर्नाटकमधील संघर्ष वाढला आहे. कर्नाटकमधून रोज भाजी, कोंबडय़ा, मांस, अंडी, कडझधान्ये घेऊन वाहने येतात. काही वाहने गुरुवारी गोव्यात पोहचली नाहीत. गोवा सरकारच्या फलोत्पादन विकास महामंडळासाठी भाजी घेऊन जे ट्रक येतात, ते मात्र गोव्यात दाखल झाले आहेत. कर्नाटक बंदला फार मोठा प्रतिसाद मिळालेला नाही, असे सांगण्यात आले. पण वाहनांवर दगडफेक होत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
कर्नाटकमध्ये उगम पावणारी म्हादई नदी गोव्यासह महाराष्ट्रातूनही वाहते. मात्र गोव्यात या नदीचा प्रवाह हा 56 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळेच गोव्यासाठी ही नदी म्हणजे जीवनदायिनी आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविले तर गोव्यातील पाणी पुरवठा प्रकल्प, शेती, जैवविविधता आणि पश्चिम घाट क्षेत्रवर मोठा परिणाम होणार आहे. आमचे सरकार म्हादई प्रश्नी कोणतीच तडजोड करणार नाही. कर्नाटकला पाणी दिले जाणार नाही, असे जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी स्पष्ट केले आहे.