गोव्यात आमदारांचे भत्ते वाढवणार, भ्रष्टाचारासाठी कारण नको - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 01:36 PM2017-11-16T13:36:02+5:302017-11-16T13:36:34+5:30
गोव्यातील सगळे आमदार तणावाखाली आहेत. हा ताण देणग्यांचा आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना देणगी द्यावी लागते. यामुळे आपले सरकार लवकरच आमदारांचे विविध भत्ते वाढवणार आहे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले
पणजी - गोव्यातील सगळे आमदार तणावाखाली आहेत. हा ताण देणग्यांचा आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना देणगी द्यावी लागते. यामुळे आपले सरकार लवकरच आमदारांचे विविध भत्ते वाढवणार आहे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. आमदारांना मग भ्रष्टाचार करण्यासाठी कारण मिळणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या ससहकार्याने आयोजित केलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
पर्रीकर म्हणाले की भत्ते वाढविल्यानंतर आमदारांचा भ्रष्टाचार थांबणार असे आपण म्हणत नाही पण निदान त्यांना तसे कारण तरी देता येणार नाही. आता त्यांच्यावर ताण आहे. माझ्याकडे देखील देणग्यांसाठी लोक येतात. आम्ही आमदारांचे वेतन वाढविल्यानंतर प्रसारमाध्यमे आमच्यावर टीका करतात पण त्यांनी आमदारांना ज्या स्थितीला सामोरे जावे लागते त्याचाही विचार करावा.
सहा वर्षांपूर्वी गोव्यातील सर्व आमदारांचे वेतन सरकारने वाढविले होते. सहा वर्षांत जशी महागाई वाढली आहे, त्या महागाईच्या तुलनेत आमदारांना वेतनवाढ दिली जाईल असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी या सोहळ्यानंतरही पत्रकारांना तपशीलाने सांगितले. त्यासाठी येत्या डिसेंबरमध्येच विधेयक अधिवेशनात मांडले जायला हवे असे मात्र काही नाही असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले.
प्रसारमाध्यमांनी बातमी देताना त्या बातमीत स्वत:ची मते घुसडवू नये. मी काहीवेळा पत्रकारांवर चिडतो. माझी भाषा काहीवेळा तिखट असते पण पत्रकारांनी माझ्यावर टीकात्मक लेखन करताना दबाव घेऊ नये. माझ्या विरोधात किवा माझ्या भूमिकेविरोधात लिहिले गेलेले लेखनही मी वाचत असतो. मात्र प्रसार माध्यमांवर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याबाबतही मी मागे राहत नाही असे मुख्यमंत्री भाषणात म्हणाले. प्रसार माध्यमांनी राजकारणाला दिशा देताना विधायक भूमिका पार पाडावी. सगळे काही नकारात्मकच छापण्याची स्पर्धा करू नये.
सरकारने गोव्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी कर्तव्य भावनेने अनेक योजना आणल्या. त्याबाबत मला श्रेय नको आहे. कारण मी काही माझ्या खिशातून त्यासाठी पैसे खर्च केलेले नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान लोकमतचे छायापत्रकार गणेश शेटकर व इतरांना या सोहळ्यावेळी पुरस्कार देऊन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.