कदंब कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वाढ: दखल घेत नसल्याने १५ रोजी भव्य सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 08:43 PM2024-02-21T20:43:00+5:302024-02-21T20:43:15+5:30
कामगारांनी येत्या १५ मार्च रोजी चलो पणजीचा नारा दिला आहे.
पणजी : गेले पंधरा येथील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत असलेल्या कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेने आंदोलन आणखी वाढविले. काल कर्मचारी व आयटकच्या कामगार नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत या कामगारांनी येत्या १५ मार्च रोजी चलो पणजीचा नारा दिला आहे. यात हजारो कामगार सहभागी होणार आहेत.
गेले १५ दिवस आंदोलन करुनही कदंब महामंडळाने तसेच सरकारने आमची विचारपुसही केली नाही. त्यामुळे काल बैठक घेऊन आंदोलनात वाढ केली आहे. १५ रोजी पणजीत भव्य सभा होणार आहे. यात आयटकच्या सर्व ४२ कामगार संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व कदंब कर्मचाऱ्यांचे कुटुंब सदस्य या सहभागी होणार आहे. अशी माहिती कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी दिली.
आपल्या विविध मागण्यांसाठी कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाच्यावतीने गेल्या ७ फेब्रवारीधरणे आंदोलन सुरू केले आहे. आज १६ दिवस झाले आहेत. रविवार वगळता हे कर्मचारी रोज सकाळी ९.३० ते दुपारी १ पर्यंत पणजीत आंदाेलन करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर बसले आहेत. कदंब बसेस बंद न ठेवता मिळेल त्या वेळेत हे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होत आहेत.