नाचणीच्या लागवडीत २५ हेक्टरने वाढ; शेतकऱ्यांना मिळाला आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:58 PM2023-09-04T15:58:10+5:302023-09-04T15:58:29+5:30
रानटी जनावरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी साेलार कुंपण
नारायण गावस, पणजी: कृषी खात्याकडून मिळत असलेल्या विविध सहकार्यामुळे यंदा नाचणी लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये केवळ २० हेक्टर भागात नाचणीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी २०२३ मध्ये ४५ हेक्टर क्षेत्रात नाचणीचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. जवळपास २५ हेक्टर जागेत वाढ झाली आहे. पूर्वी लाेक आपलल्या शेतीबागायतीत माेठ्या प्रमाणात नाचणीची लागवड करत होते. पण रानटी जनावराकडून होत असलेल्या नासाडीमुळे अनेक जणांनी नाचणीची शेती करणे साेडून दिले होते. आता कृषी खात्याकडून साेलार कुंपण तसेच अनेक आधुनिक कुंपण घालण्यासाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जामिनीत रानटी जनावरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी साेलार कुंपण घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात आधार मिळाला आहे.
नाचणीला चांगली मागणी
आरोग्याला लाभदायक असल्याने नाचणीला मोठी मागणी आहे. बाजारात नाचणी ४० ते ४५ रुपये किलोने विकले जात आहे. ग्रामिण भगापासून शहरातील भागातील सर्वच लोक नाचणीची भाकरी खातात. पचन क्रियेस चांगल असल्याने या नाचणीला मोठी मागणी आहे. तसेच लहान मुलांना नाचणीचे सत्व दिले जाते. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. अनेक याेजना सवलती दिल्या जातात. त्यामुळे यावर्षेी नाचणी पिकाची ४५ हेक्टर जमीन लागवडीखाली आणलेली आहे. शेतकऱ्यांना नाचणीची बियाणे मोफत दिली आहे. तसेच लागवडीचा खर्च २० हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना देण्यात येतात, असे कृषी संचालक नेविल अफान्सो यांनी सांगितले.