धरणांच्या पातळीत वाढ
By admin | Published: July 21, 2016 02:17 AM2016-07-21T02:17:53+5:302016-07-21T02:17:53+5:30
पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे
पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे धरण भरण्यास केवळ ५0 ते ६0 सेंटीमीटर बाकी आहे. पाऊस अखंड चालू राहिल्यास आज, गुरुवारी हे धरण भरून पाणी ओसंडून वाहू शकते. मात्र, त्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने धरण भरले तरी त्यापासून परिसरास धोका नाही, असे जलस्रोत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ अंजुणे धरणाच्या बाबतीत पाण्याची पातळी वाढली की दरवाजे मात्र उघडावे लागतात.
जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अंजुणे धरण वगळता इतर धरणांच्या बाबतीत ती भरली की पाण्याचा विसर्ग आपोआप होतो त्यामुळे कोणताही धोका नाही. अंजुणे धरण भरण्यासाठी अजून साडेआठ मीटर पातळी बाकी आहे. असाच पाऊस सलग १५ ते २0 दिवस कोसळत राहिला तरच ही स्थिती उद्भवेल.
बुधवारी दुपारी साळावली धरणातील पाण्याची पातळी ४0.३५ मीटर होती. साधारणपणे ४१.१५ मीटरपर्यंत ती पोहोचली की धरण भरून पाणी बाहेर वाहू लागते. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २0 जुलै रोजी साळावलीतील पाण्याची पातळी ३९.८५ मीटर होती.
आमठाणे धरणाच्या बाबतीत तेथील क निष्ठ अभियंता के. पी. नाईक म्हणाले की, या धरणाची क्षमता ५0 मीटर पातळीची आहे. बुधवारी पाण्याची पातळी ४८.६५ मीटर होती. हे धरण भरण्यास १.३५ मीटर बाकी आहे; परंतु ते एवढ्यात भरणे शक्य नाही; कारण धरणाच्या वरच्या भागात व्याप्ती मोठी असते. आठ ते दहा दिवस अव्याहत पाऊस कोसळला तर ते पाणी ओसंडून वाहू लागेल. मात्र, पाण्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने या धरणापासूनही धोका नाही. (प्रतिनिधी)